केडीएमसी महासभा, मनसे भाजप वाद, दिल्ली विद्यार्थी आंदोलन, KDMC, मनसे, भाजप, हर्षद पाटील, दीपेश म्हात्रे, हर्षली चौधरी, महायुती
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) महासभेत दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ मनसे आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी आंदोलन केल्यानंतर आता महायुतीतील वाद अधिकच चिघळला आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
महासभेत मनसेने ठाकरे गटाच्या नगरसेवकांसोबत आंदोलन केल्याने भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी, “एकीकडे केडीएमसीच्या सत्तेत सहभागी व्हायचे आणि दुसरीकडे सत्तेविरोधात आंदोलन करायचे, ही दुटप्पी भूमिका आहे. मनसेने सत्तेतून बाहेर पडावे,” अशी मागणी केली.
या वादात केडीएमसीच्या महापौर हर्षली चौधरी यांनी मनसेची भूमिका स्पष्ट करत, “मनसे महायुतीसोबत सत्तेत कायम राहणार आहे. आंदोलनाबाबत पूर्वकल्पना नव्हती, मात्र मनसे सत्तेतच राहील,” असे सांगितले.
दरम्यान, मनसेने भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी भाजपवर टीका करत, “सत्तेसाठी भाजपच लाचार झाली आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. उल्हासनगर महापालिकेत भाजप आमदार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये रोज वाद होतात, तरीही भाजप सत्तेत आहे. ठाण्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेबाबत उपदेश करण्यापूर्वी अभिमान असेल तर भाजपने स्वतः केडीएमसीच्या सत्तेतून बाहेर पडावे” असा टोला लगावला..केडीएमसी महासभेतील आंदोलनानंतर सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Thane News : ठाण्यात महावितरणाचा अजब कारभार, घरातील लोक झोपले असताना बसला स्मार्ट मीटर






