धक्कादायक ! अपघातानंतर तिघांना मारहाण करून महिलेची काढली छेड; कर्जत तालुक्यातील प्रकार (फोटो सौजन्य- pinterest)
कर्जत : कर्जत तालुक्यातील बिरदोले गावात बुधवारी रात्री अपघातग्रस्त जखमी तरुणाच्या चौकशीवरून वाद निर्माण झाला. त्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले आणि त्यात तेथे भांडण सोडण्यासाठी आलेल्या महिलेची छेड काढण्यात आल्याची घटना घडली. याबाबत नेरळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बिरदोले गावात रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गावातील तरुण निखिल परशुराम कालेकर याचा अपघात झाल्याने त्याचे काका सतीश कालेकर हे रुग्णालयात घेऊन गेले होते. अपघात घडला त्यावेळी कालेकर आणि मानिवली गावातील तरुण यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मानीवली, बिरदोले आणि देवपाडा येथील सात तरुण हे निखिल परशुराम कालेकर याच्या घरासमोर जमले. त्यावेळी अंजना परशुराम कालेकर या त्यांच्या अंगणात उभ्या होत्या. त्यावेळी ते सात तरुण आले आणि त्यांनी अंजना कालेकर तसेच साक्षीदार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
आवाज ऐकून परशुराम वाळकु कालेकर, प्रेम परशुराम कालेकर आणि अंजना परशुराम कालेकर हे एकत्र आल्यावर त्यांना तेथील प्लास्टिक खुर्ची तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.
तिघांना केली अटक
या माराहाणीत ते तिघे जखमी झाले असून, देवपाडा गावातील एका तरुणाने महिलेसोबत अश्लील वर्तन करून मनास लज्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ‘सतीश कुठे भेटेल तेथे मुडदा पाडू’, अशी धमकी दिल्याची तक्रार नेरळ पोलिस ठाणे येथे दाखल झाली. याबाबत नेरळ पोलिसांनी फिर्यादी यांच्या सांगण्यानुसार, तत्काळ गुन्हा दाखल केला. मानिवली येथील तीन, देवपाडा आणि बिरदोले तसेच अन्य अनोळखी तीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन आरोपींना नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.
राज्यात वाढतंय गुन्हेगारीचे प्रमाण
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना नुकतीच समोर आली होती. प्रेमसंबंघाच्या संशयातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा प्रकार सुखसागरनगर परिसरात घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.






