अरुंद आणि धोकादायक पुलावरून पिकअप गाडी नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला (फोटो - सोशल मीडिया)
Hingoli News : जिंतूर : पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाजवळील अत्यंत अरुंद आणि धोकादायक पुलावरून पिकअप गाडी नदीपात्रात कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका ३१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.(Hingoli News) अंकुश रामेश्वर शिंदे (रा. शिंदे टाकळी, ता. सेनगाव जिल्हा हिंगोली) असे मृत युवकाचे नाव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईचा आणखी एक बळी गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. (Crime News)
अंकुश शिंदे हे मंगळवारी (दि.३) रात्री ८ ते ९ च्या सुमारास आपल्या पिकअप गाडीने जालना येथून गावाकडे निघाले होते. येलदरी येथील अरुंद पुलावरून जात असताना पुलाला कठडे नसल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन थेट पूर्णा नदीच्या पात्रात कोसळले. सध्या धरणातून विसर्ग सुरू असल्याने नदीला मोठा प्रवाह आहे. गाडी पाण्यात पडल्यानंतर पुलाला अडकली, मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने अंकुश यांना बाहेर पडता आले नाही. ही घटना रात्री घडल्याने कोणाच्याही लक्षात आली नाही. बुधवारी सकाळी पुलावरून ये-जा करणाऱ्यांना वाहन दिसल्यानंतर हा अपघात उघडकीस आला. मागील वर्षी येलदरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे या जुन्या पुलाचे कठडे वाहून गेले होते. तेव्हापासून हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे.
हे देखील वाचा: धुलिवंदनाला’ मिनी रेव्ह पार्टी’ची नवी संस्कृती? भरमसाठ तिकीट असणाऱ्या डान्स पार्ट्यांवर प्रश्नचिन्ह
वापराविना नवा पूल ठरतोय पांढरा हत्ती
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आधुनिक ‘सीलिंग’ पद्धतीचा पूल बांधला आहे. मात्र, केवळ पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते पूर्ण झाले नसल्याने हा पूल मागील वर्षभरापासून वापराविना पडून आहे, नवीन पूल तयार असतानाही वाहनधारकांना जीव धोक्यात घालून जुन्या अरुंद पुलावरून कसरत करावी लागत आहे.
४ तास वाहतूक कोंडी
बुधवारी येलदरीचा आठवडी बाजार असल्याने पुलावर मोठी गर्दी असते. पुलाच्या मध्यभागी ही घटना घडल्याने आणि बचाव कार्य सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या शर्थीने मृतदेह बाहेर काढला, रस्ते का पूर्ण केले जात नाहीत? आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.
हे देखील वाचा: एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत
सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत
दैनिक नवराष्ट्र मध्ये १६ फेब्रुवारी रोजी ‘सुरक्षा कठडे नसल्याने धोका येलदरी- सेनगाव पुलावर अनेकांनी गमावला आपला जीव’ याविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आणि हा अपघात घडला. याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.






