भांडणं सोडवण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; अंगावरची कपडे फाडत...
मंगळवेढा : एका 35 वर्षीय विवाहित महिलेच्या पतीबरोबर झालेल्या मागील भांडणाचा राग मनात धरुन एकाने लाथा बुक्क्याने मारहाण केली. यादरम्यान, आपल्या पतीला सोडविण्यास गेलेल्या महिलेचा ब्लाऊज फाडून गैरवर्तन करण्यात आले. तसेच या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी हाजीमलंग मकबूल शेख (रा.तांडोर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील पीडित फिर्यादी महिला हिच्या घरी 13 जून रोजी दुपारी 3 वाजता चिंचणी मायाक्का देवीच्या सुहासिनीचा कार्यक्रम असल्याने कार्यक्रमाला अन्य मंडळी आली होती. यावेळी आरोपी हाजीमलंग शेख हा दुचाकीवरून घरासमोर आला. यावेळी पीडित महिलेचे पती घरासमोर झाडाखाली बसले होते. आरोपीने पीडित महिलेच्या पतीस ‘मी परत येतो, तू इथून जायचे नाही’ असे म्हणून निघून गेला. त्यानंतर सुमारे दहा मिनिटांनी आरोपी हा परत दुचाकीवरून येऊन फिर्यादीच्या पतीस घराबाहेर हे असे म्हणाला.
त्यावेळी ते बाहेर गेले असता मागील झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी पीडित महिला तथा फिर्यादी गेली असता आरोपीने पीडितेचा ब्लाऊज फाडून अंगाशी झोंबाझोंबी केली व मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ‘तुम्ही इथे कसे राहता? तुम्हाला जीवंत सोडणार नाही?’ असे म्हणून काठीने पाठीवर मारहाण केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलीस करीत आहेत.