पिंपरीत किरकोळ वादातून मारहाण (फोटो- istockphoto)
पिंपरी: मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचे पर्यवसान महिलेस बॅटने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात झाले. या प्रकरणी थेरगाव येथील तिघांविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संदिपनगर, थेरगाव येथे घडली.
या प्रकरणी एक महिला फिर्यादी म्हणून पुढे आल्या असून, अनिल कांबळे व दोन महिला आरोपी (सर्व रा. संदिपनगर, थेरगाव, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीचा लहान मुलगा आणि आरोपींची मुले यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यातूनच आरोपी महिला क्रमांक २ व ३ यांनी फिर्यादीच्या मुलीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
सायंकाळी ६ वाजता फिर्यादी आरोपींच्या घरी जाऊन “माझ्या मुलीला का मारहाण केली?” असे विचारत असताना पुन्हा दोघी आरोपी महिलांनी फिर्यादी व त्यांच्या मुलीला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. या दरम्यान, आरोपी अनिल कांबळे याने घरातून बॅट आणून फिर्यादीच्या डाव्या हातावर जोरदार मारहाण केली. त्यामुळे त्यांचा डावा हात फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलीला डाव्या हातावर व कमरेवर बॅटने मारहाण करण्यात आली. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या एका साक्षीदाराच्या पाठीवरही बॅटने मारहाण करून जखमी करण्यात आले.
PCMC Crime: रागाने बघतोस काय म्हणत चौघांनी एका तरुणावर थेट…; पिंपरीमध्ये घडली धक्कादायक घटना
पिंपरीमध्ये घडली धक्कादायक घटना
रागाने बघितल्याच्या कारणावरून चौघांनी एका तरुणावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली. अनिष धनंजय ढवळे (वय २१, रा. जुनी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैबाज शेख (वय २१, रा. बोपोडी), विराज काटे (वय २०, रा. औंध), आदित्य, बल्ल्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिष हे जुनी सांगवी येथे ओम कलेक्शन दुकानासमोर भेळ खात थांबले होते. तिथे आरोपी आले. अनिष हे आरोपींकडे रागाने बघत असल्याच्या संशयावरून आरोपींनी अनिष यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात अनिष गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी कुऱ्हाड हवेत फिरवून दहशत निर्माण केली. पोलिसांनी विराज काटे याला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.