रिक्षाचालकांकडून तरुणांना मारहाण
छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसासाठी केक आणण्यास निघालेल्या तीन तरुणांना हूल दिल्याचा जाब विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना दोन दिवसांपूर्वी लेमन ट्री हॉटेलसमोरील रोडवर घडली.
अजय गौतम दाभाडे, प्रज्वल वियज भंडारे, आकाश भाऊसाहेब निकाळजे (सर्व रा. आंबेडकरनगर) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपी अजय दाभाडे याच्यावर यापूर्वीही सिडको पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे.
याप्रकरणात हर्ष सुखदेव चव्हाण (वय २३, रा. जयभवानीनगर) हे आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी निघाले होते. लेमन ट्री हॉटेलसमोर सर्विस रोडवरून कॅनॉट प्लेसच्या दिशेने जात असताना रिक्षाच्या (एमएच-२०-ईके-९६०६) चालकाने त्यांच्या दुचाकीला हुल दिली. त्यामुळे हर्ष चव्हाण यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली असता रिक्षाचालकाने खाली उतरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, वाद वाढत असतानाच संबंधित रिक्षाचालकाने आपल्या दोन साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर तिघांनी मिळून हर्ष चव्हाण, आदित्य बाळू अहिरे (वय १९) आणि रोहित विष्णु सोनवळे (वय २०) यांना कमरेचा बेल्ट आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.
नागरिकांमधून संताप व्यक्त
मारहाणीत आदित्य अहिरे व रोहित सोनवळे हे रक्तबंबाळ झाले, तर हर्ष चव्हाण यांनाही मुक्का मार लागला आहे. परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार जगताप करत आहेत. या घटनेने सिडको परिसरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गर्भवती महिलेची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, मध्यप्रदेशच्या खैरी येथील पूनम तुमाने हिच्या मृतदेहाचे तुकडे बोंडरानी जंगल परिसरात सापडले. ही घटना मंगळवारी (दि. ३) उघडकीस आली. दवनीवाडा पोलिसांनी या हत्येप्रकरणातील आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने आरोपीला शक्रवारी (दि.६) पर्यंत पोलिस कस्टडीमध्ये ठेवले. याच दरम्यान, आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने प्रेमप्रकरणातून पूनमची हत्या केल्याचे सांगितले.
Uttarpradesh Crime: टीव्ही पाहण्यावरून आईची ओरड, 12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल






