काँग्रेसच्या ७० पैकी ६७ उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त; मतांचा टक्का किती? एकदा वाचाच
दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला खातंही उघडता आलं नाही. सलग तिसऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. ७० पैकी ६७ काँग्रेस उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत २.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र दिग्गज नेत्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान पुन्हा लोकांचा विश्वास जिंकून कॉंग्रेस २०३० मध्ये सत्तेत येईल, असा विश्वास कॉंग्रेसने व्यक्त केला आहे.
काँग्रेसच्या फक्त तीन उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आली आहे. त्यापैकी, कस्तुरबानगर येथील अभिषेक दत्त हे दुसरे स्थान पटकावणारे एकमेव काँग्रेस नेते आहेत. या यादीत नांगलोई जाट येथील रोहित चौधरी आणि बादली येथील देवेंद्र यादव यांचा समावेश आहे. बहुतेक काँग्रेस उमेदवार भाजप किंवा आप नंतर तिसऱ्या क्रमांकावर होते, परंतु काही जागांवर काँग्रेस उमेदवार एआयएमआयएम उमेदवारांपेक्षा मागे पडले. ज्यामध्ये मुस्लिम बहुल भागांचा समावेश आहे.
दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव स्वतः बादली मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा कालकाजी मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर आणि माजी मंत्री हारून युसूफ बल्लीमारन मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर होते, यांनी १९९३ ते २०१३ दरम्यान पाच वेळा प्रतिनिधित्व केलं होतं.
काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत थोडीशी सुधारणा झाल्यामुळे आम आदमी पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. अनुसूचित जाती आणि मुस्लिम बहुल भागात काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागलं. तिथे काँग्रेसला किरकोळ फायदा झाला, मात्र ‘आप’ला पराभव पत्करावा लागला आणि भाजपला फायदा झाला. निवडणुकीत ‘आप’च्या मतांच्या टक्केवारीत १० टक्के घट झाली आहे. आम आदमी पक्षाला ४३.१९ टक्के मते मिळाली आहेत, तर २०२० च्या निवडणुकीत त्यांना ५३.६ टक्के मते मिळाली होती.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत २.१ टक्के सुधारणा झाली आहे, परंतु या मतांच्या टक्केवारीचे जागांमध्ये रूपांतर होऊ शकलं नाही. २०२५ च्या निवडणुकीत पक्षाला ६.३९ टक्के मतं मिळाली आहेत, तर २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ४.३ टक्के मतं मिळाली होती.२००८ मध्ये (दिल्लीत काँग्रेसने शेवटचे सरकार स्थापन केले तेव्हा), काँग्रेसचा मतांचा वाटा ४०.३१ टक्के होता. काँग्रेसची ही टक्केवारी २०१३ मध्ये २४.५५ टक्के, २०१५ मध्ये ९.७ टक्के आणि २०२० मध्ये ४.३ टक्के अशी घसरली होती. त्याचवेळी ‘आप’ने काँग्रेसला धक्का दिला आणि २०१३ मध्ये २९.६ टक्के, २०१५ मध्ये ५४.६ टक्के आणि २०२० मध्ये ५३.६ टक्के मते मिळवली.
एका पक्षाच्या नेत्याने सांगितले, ‘आपण जे गमावले होते त्यातील काही भाग आपण परत मिळवला आहे. ही लढाई सुरूच राहील. काँग्रेस नेत्यांना मात्र ही लांब पल्ल्याची लढाई वाटत आहे. कारण या निवडणुकीत पक्षाला सुमारे ५.८ लाख मते मिळाली आहेत, जी २०२० मध्ये मिळालेल्या ३.९५ लाख मतांपेक्षा थोडी जास्त आहेत. पण २०१५ मध्ये ८.६७ लाख मते आणि २०१३ मध्ये ८ जागा जिंकताना १.९३ कोटी मते मिळाली होती, त्यापेक्षा हे खूप दूर आहे. २००८ मध्ये काँग्रेसने ४३ जागा जिंकून जिंकल्या होत्या. त्यावेळी मंताची संख्याही मोठी होती.
दरम्यान या निवडणुकांचा बिहारमधील विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत तणाव निर्माण होऊ शकतो. हरियाणा आणि महाराष्ट्रानंतर, दिल्लीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे विरोधी गटातील काँग्रेसचे वर्चस्व आणखी कमी होईल. काँग्रेस आणि आपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दिल्ली, चंदीगड आणि हरियाणामध्ये युती केली असली तरी दिल्लीत मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता.