मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संलग्न विद्या भारती (Vidya Bharti) देशभरात पाच नवीन विद्यापीठे (RSS University) स्थापन करणार आहे. विद्या भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव यतींद्र शर्मा (Yatindra Sharma) यांनी हरिद्वार (Haridwar), उत्तराखंड येथे याबाबत माहिती दिली आहे.
यतींद्र शर्मा म्हणाले, नवीन विद्यापीठांचे उद्दिष्ट शिक्षणात सकारात्मक बदल घडवून आणणे आहे. देशातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आता संघाच्या उच्च शिक्षण संस्थेद्वारे शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे हा याचा उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरएसएसने यापूर्वीच कर्नाटकातील बंगळुरु येथे चाणक्य विद्यापीठ सुरु केले आहे. तर, गुवाहाटी-आसाम येथे आणखी एका विद्यापीठावर काम सुरू आहे. बंगळुरू येथील विद्यापीठाच्या पहिल्या बॅचसाठी एकूण २०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यापीठात विद्या भारती शाळांमधील सुमारे ५० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. आरएसएसद्वारे चालवल्या जाणार्या शैक्षणिक संस्था सर्व वर्ग, जाती आणि पंथाच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. आरएसएसच्या २९ हजार शाळांमध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
आरएसएस संलग्न विद्या भारतीने अलीकडेच केंद्राने सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल (NEP) जागरुकता वाढवण्याची मोहीम जाहीर केली. या मोहिमेचा उद्देश ‘भारत केंद्रित शिक्षण’च्या पैलूंवर प्रकाश टाकणे हा आहे. ११ सप्टेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे.






