File Photo : Samarjit Ghatge
मुरगड : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गावोगावी वाटलेल्या विकासगंगा पुस्तकात माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचेही श्रेय मुश्रीफ यांनी घेतले. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी प्रा. मंडलिक यांना बाजूला ठेवून मुश्रीफांना संधी दिली. त्यांना मंत्रिपदासह विविध सत्ता दिल्या. त्याच मुश्रीफांनी प्रा. मंडलिक यांच्या निधीबरोबरच त्यांचे राजकीय करिअरही चोरल्याची खोचक टीका महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केली.
हेदेखील वाचा : New CJI Sanjeev Khanna: संजीव खन्ना यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ;राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा
कुरणी (ता.कागल) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, ‘हमीदवाडा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिवंगत सदाशिव मंडलिक यांना हसन मुश्रीफ यांनी दिलेला त्रास स्वाभिमानी जनता विसरलेली नाही. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक म्हणाले होते, हसन मुश्रीफ नावाच्या राक्षसाला मीच गाढणार. त्यांचे हे अपूर्ण स्वप्न या निवडणुकीत कागलची स्वाभिमानी जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘हसन मुश्रीफांनी विकास केला तो ठराविक लोकांचा. त्यांनी ठराविक लोकांसाठी तालुका वेठीस धरला आहे. त्यांच्याकडील ठराविक नेते आणि लोक पैसे मिळवण्याचे काम करत आहेत. तुम्ही इतका विकास केल्यानंतर तुम्हाला दिशाहीन गोष्टी का कराव्या लागत आहे. हसन मुश्रीफांना लोकशाही म्हणजे काय हे दाखवण्याची तुम्हा आम्हाला उत्तम संधी आली आहे. या संधीचं सोनं करून मुश्रीफांना पराभूत करूया’.
सागर कोंडेकर म्हणाले, ‘पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, महिलांना, युवतींना, तरुणांना फसवलं. अशा दलबदलू, सत्तापिपासू मुश्रीफांना या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही’.
स्वागत व प्रास्ताविक सागर पाटील यांनी केले.यावेळी शिवानंद माळी, संकेत देशमुख, एकनाथ देशमुख,शिवाजी कांबळे,संभाजी भोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस दत्तामामा खराडे,लक्ष्मण जात्राटे, विनोद पाटील, किसन पाटील,भाऊसो पाटील,आनंदा थोरवत, शामराव मांगोरे,तातोबा कांबळे, रणजीत कांबळे आदी उपस्थित होते.आभार प्रकाश पारटे यांनी मानले.
मुश्रीफसाहेब साडेतीनशे कोटी कुणाच्या घशात घालण्यासाठी?
” या निवडणुकीत मुश्रीफ मायनस झाले आ्हेत. त्यांच्यासोबत आता कोणी नाही. मुश्रीफांचा विकास म्हणजे ठराविक कंत्राटदारांचा झालेला विकास. कागल ते निढोरी रस्ता एवढा चकाचक असताना पुन्हा साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी कुणाच्या घशात घालण्यासाठी मंजूर केला आहे. याचे उत्तर पालकमंत्री हसन मुश्रीफांनी जनतेला द्यावे. असे मत कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : मध्य प्रदेशातील या चार ठिकाणी दिसला ‘सरकटे का आतंक’! एक्सप्लोर करताच मिळेल थ्रिलिंग अनुभव