आठवलेंच्या पक्षाचे ३९ उमेदवार मुंबईत रिंगणात
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच, महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ आठवले गटाने बंडाचे निशाण फडकवले आहे. भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) आमच्याशी विश्वासघात केला आहे, असा घणाघाती आरोप करत रामदास आठवले यांनी मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली.
रिपाइंने मंगळवारी ३९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून, मुंबईत दलित मतांच्या विभाजनामुळे भाजप-शिंदे सेनेची डोकेदुखी वाढणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी रिपाइंला ७ जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि स्तरावर चर्चाही झाली होती. मात्र, भाजपने १३७ आणि शिवसेनेने ९० जागांची घोषणा केली. पण या यादीत रिपाइंच्या एकाही उमेदवाराचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही महायुतीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आठवले यांनी आक्रमक पवित्रा घेत ३९ उमेदवार जाहीर केले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने
दरम्यान, मुंबईतील अनेक वॉर्डामध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत. विशेषतः ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई आणि चेंबूर-भांडुप पट्ट्यात रिपाइंला मानणारा मोठा वर्ग आहे. आजवर ही मते महायुतीच्या पारड्यात पडत होती. मात्र, आता रिपाइंने 39 उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दलित मतांचे विभाजन अटळ आहे. मुंबईच्या निवडणुकीत जिथे १००-२०० मतेही जय-पराजयाचे गणित बदलू शकतात, तिथे रिपाइंचा हा ‘स्वबळ’ पॅटर्न भाजप-सेनेसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
आता मागे हटणार नाही
आम्ही शेवटपर्यंत संयम राखला. ७ जागांची आमची माफक मागणी होती, पण आम्हाला झुलवत ठेवण्यात आले. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळेच आम्ही मुंबईच्या अस्मितेसाठी आणि आमच्या हक्कासाठी ३९ जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
– रामदास आठवले, रिपाइंचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री
निवडणुकीत भाजप-शिवसेना स्वबळावर
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, काँग्रेससह सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. त्यातच महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) १५ जानेवारीला होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर आणि पुणे महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. कारण दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची चर्चा फिस्कटली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिका निवडणुकीत हे पक्ष वेगळे दिसणार आहेत.
हेदेखील वाचा : Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी नजर






