फोटो सौजन्य- सोशल मीडिया
सावंतवाडी मतदारसंघाच्या चौरंगी लढतीमध्ये मंत्री दीपक केसरकरांनी तब्बल 39899 मतांनी ठाकरे गटाच्या राजन तेली यांच्यांवर मात केली आहे.दीपक केसरकर यांना 81008 मते मिळाली तर राजन तेलींना 41109 मते मिळाली. सावंतवाडी मतदारसंघामध्ये प्रमुख लढत ही शिवसेना शिंदे गटाचे दिपक केसरकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजन तेली यांच्यात असली तरीही या लढतीमध्ये सर्वात मोठी भूमिका ही अपक्ष उमेदवार विशाल परब आणि अर्चना घारे परब ठरतील असा होरा होता. त्यात विशाल परब यांनी 33281 मते मिळवली मात्र अर्चना घारे परब यांना केवळ 6174 मतांवर समाधान मानावे लागले.
चौरंगी लढतीमुळे या मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत होती. निवडणुक जाहीर होताच राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश करत तेथून उमेदवारी मिळवली. शरद पवार गटामधील अर्चना घारे परब याही अपक्ष उभ्या राहिल्या मात्र दीपक केसरकरांसमोर तेलींसोबत मोठे आव्हान होते ते विशाल परब यांचे, भाजपचे विशाल परब यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यामुळे या मतदारसंघात प्रचंड चुरस निर्माण झाली होती. विशाल परब यांची मते केसरकरांना विजयापासून रोखू शकतात अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र आज केसरकरांनी दणदणीत विजय मिळवत मतदारसंघावरील पकड कायम असल्याचे दाखवून दिले.
या विजयामुळे दीपक केसरकर हे सलग चौथ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पहिल्यांदा विजय मिळवला त्यानंतर शिवसेनेकडून सलग 3 वेळा ते निवडून आले आहेत. 2014 पासून ते राज्यात मंत्री आहेत. 2022 च्या राजकीय उलथापालथीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते महायुती सरकारमध्ये सामील झाले होते.
महायुतीचे वादळ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीचा झंझावात पाहायला मिळत आहे.महायुती आतापर्यंत तब्बल 226 जागांवर आघाडी आहे.132 जागांवर आघाडी मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपचे हे यश विधानसभेतील सर्वात मोठी कामगिरी ठरली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने तब्बल 54 जागा आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने 40 आघाडी मिळवली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या निकालानुसार घवघवीत यश संपादन केले आहे. जाहीर झालेल्या सर्व एक्झिट पोल्सच्या अंदाजांपुढे जात महायुतीने यश मिळवले आहे.
महाविकास आघाडी नेस्तनाबूत
महायुतीच्या जबरदस्त कामगिरीपुढे महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाल्याचे पाहायला मिळत असून केवळ 58 जागांवर आघाडी मिळाली आहे. सध्या कॉंग्रेस 18 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 20 जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गट 12 जागांवर आघाडीवर आहे.