आमदार अतुल भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ प्रीतीसंगम येथे दर्शन घेतले (फोटो - टीम नवराष्ट्र)
कराड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. महायुती लवकरच सत्ता स्थापन करणार असून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. दरम्यान, राजकीय सुसंस्कृतपणाचा पांयडा पाडलेले आणि शिकवण देणारे नेते यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन आहे. या निमित्ताने राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते अभिवादन करण्यासाठी कराडमधील प्रीतीसंगम या त्यांच्या स्मृतीस्थळावर येत असतात. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभला असून त्यांनी राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा विचार दिला. त्याच यशवंत विचारांना अनुसरून यापुढे काम करणार असून सर्वसामान्य जनतेच्या फायद्याच्या दृष्टीने चांगले, सुसंस्कृत राजकारण करण्यासाठी आपण सज्ज झालो असल्याचे मत आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी सोमवारी (दि.25) कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुष्प चक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला स्वीकारले, याचा मला जास्ती आनंद झाला आहे. माझ्यावरील जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून जनतेने मला दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न राहील. कराड दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जे लागेल ते आपण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ग्वाही दिली आहे. या मतदारसंघातील जनतेच्या सर्व मागण्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे,” असा विश्वास अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
कराड दक्षिणमधून आपला विजय झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तुम्ही त्यांची भेट घेणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, “कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आहे. सुसंस्कृत राजकारणाचा त्यांचा विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. यामुळे निश्चित चांगले, प्रगतीचे काम करत असताना विरोधकांशी चर्चा करण्याच्या बाबतीतचा प्रयत्न भविष्यकाळात निश्चित राहील. तसेच सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याबद्ददलची भूमिका घेऊ,” असेही मत नवनिर्वाचित आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केले आहे.
प्रीतीसंगमावर नात्यांचा संगम
प्रीतीसंगमावर अभिवादन करायला गेलेले अजित पवार व रोहित पवार यांची भेट झाली. यावेळी काका पुतण्यामधील संवादाची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा झाली. अजित पवार यांनी रोहित पवारांना ये ये..दर्शन घे काकांचं, असे अजित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी देखील काकांना खाली वाकून नमस्कार केला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार यांनी रोहित पवार यांना म्हणाले की, “थोडक्यात वाचला ढाण्या… माझी सभा झाली असती तर काय झालं असतं…”असे अजित पवार म्हणाले. यानंतर हसून दोघेही नेते गेले. मात्र या खास भेटीची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.