सातारा : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधुम आता संपली आहे. लवकरच महायुतीकडून सत्ता स्थापन केली जाणार असून मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आज (दि.25) रोहित पवार व अजित पवार यांची निवडणूक नंतर भेट झाली आहे. या भेटीवेळी काकाने पुतण्याला दिलेला सल्ला आणि टोला याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होत आहे.
आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री व सुसंस्कृत राजकारणाची मुहूर्तमेढ रोवणारे यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन आहे. या निमित्ताने त्यांचे आशिर्वाद व स्मरण करण्यासाठी नेतेमंडळी कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर येत आहेत. अजित पवारही आपल्या नेत्यांसह प्रीतीसंगमावर पोहोचले होते. त्यावेळी शरद गटाचे आमदार रोहित पवार समोरासमोर आले. अजित पवार आणि रोहित पवार यांची ही प्रीतीसंगमावरील भेट आणि संवाद राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये रोहित पवार यांना सल्ला देत कर्जत जामखेडच्या निकालावर भाष्य केले. तसेच रोहित पवार यांना खाली वाकून नमस्कार करायला लावला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
नेमकं झालं काय?
प्रीतीसंगमावर रोहित पवार व अजित पवार यांची अचानक भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून सांगितले की, ये ये..दर्शन घे काकांचं, असे अजित पवार रोहित पवार यांना म्हणाले. रोहित पवार यांनी देखील काकांना खाली वाकून नमस्कार केला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार यांनी रोहित पवार यांना म्हणाले की, थोडक्यात वाचला ढाण्या… माझी सभा झाली असती तर काय झालं असतं…असे अजित पवार म्हणाले. यानंतर हसून दोघेही नेते गेले. मात्र या खास भेटीची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले की, ते माझे काका आहेत म्हणून पाया पडलो. आतातरी विचारांमध्ये भिन्नता आहे, शेवटी संस्कृतीप्रमाणे वडीलधारी व्यक्तीच्या पाया पडणं माझी जबाबदारी आहे. 2019 च्या निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली होती. चव्हाण साहेबांच्या स्मृतिठिकाणावर भेदभाव करून चालत नाही. संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे तेच आम्ही केलं आहे. सभा झाली असती तर काही प्रमाणात वर-खाली झालं असतं. उलटंही होऊ शकलं असतं. मात्र ते बारामतीमध्ये अडकून पडले होते. शेवटी ते मोठे नेते होते आणि निर्णय त्यांचा होता. पक्षाचे आमदार निवडून आले चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं अभिनंदन केलं, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल हाती आला. यंदाच्या निवडणुकीमध्ये चुरशीची लढत होईल असे वाटत होते. मात्र लाडक्या बहिणींच्या आशिर्वादाने महायुतीला एकतर्फी भन्य विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीचा अनपेक्षित असा पराभव झाला आहे. भाजपला यामध्ये 132, शिंदे गटाला 57 तर अजित पवार यांच्या पक्षाला 41 जागा मिळाल्या आहेत. रोहित पवार आणि भाजप नेते राम शिंदे यांच्यामध्ये कर्जत जामखेडमध्ये एकदम चुरशीची लढत झाली. पिछाडीवर असलेले रोहित पवार यांचा केवळ 1243 मतांनी विजय झाला आहे. यावरुन अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला आहे.