अजित पवार व शरद पवार हे एकत्रित येऊ शकतात अशी राजकीय भविष्यवाणी करण्यात आली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. निकाल हाती आला असून मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. महायुतीचा एकतर्फी विजय झाला असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवार गट व शिंदे गटाने चांगला विजय मिळवला आहे. त्यामुळे शरद पवार गट व उद्धव ठाकरे यांना धक्का मिळाला आहे. आता शरद पवार व अजित पवार हे एकत्र येऊ शकतात, याबाबत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने वक्तव्य केले आहे.
अजित पवार यांना 41 जागांवर विजय मिळाला आहे. तर शरद पवार यांना केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे. महायुतीचा विजय झाला असला तरी अद्याप त्यांनी सरकार स्थापन केलेले नाही. सत्तास्थापनेपूर्वी महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु आहे. दिल्ली दरबारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस हे रवाना झाले आहेत. तर शिंदे गट व पवार गटाच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नावांची शिफारस केली जात आहे. मात्र शरद पवार व अजित पवार हे कधीही एकत्रित होऊ शकतात, असे वक्तव्य आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नरहरी झिरवाळ यांनी एका माध्यमवाहिनीशी संवाद साधला. यावेळी झिरवाळ म्हणाले की, “यावेळी त्यांना अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावेत का याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा किंवा अपेक्षा म्हणण्यापेक्षा जनतेचीही इच्छा आहे. परंतू शेवटी हे महायुतीचे नेते आहेत. त्यात मग पंतप्रधान मोदी, अमित शाह हे बसून जो काही निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य करावा लागेल. पण माझी विनंती आहे की, दादांना एकदा मुख्यमंत्रीपद द्यावं, अशी माझी इच्छा आहे”, असे नरहरी झिरवाळ म्हणाले.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले की, “मी दररोज मंत्रालयात जात असतो. त्यामुळे आता मलाही कोणतंही एखादं मंत्रीपद दिलं तरी चालेल, पण द्यावं ही विनंती. शरद पवार अजित पवार कधीही एकत्र येऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोण कोणाचा शत्रू मित्र या गोष्टी सुरुच असतात,” असे सूचक विधान नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.