कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निकालावर घेतला संशय घेतला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये महायुतीने मारलेल्या मुसंडीमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. राज्यामध्ये झालेल्या फुटीर राजकारणामुळे ही लढाई चुरशीची होईल असा सर्वांचा अंदाज होता. त्यामुळे दोन्ही युतींनी कसून प्रचार केला. मात्र महाराष्ट्राचा निकाल हा पूर्णपणे एकतर्फी लागला. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. हा पराभव एवढा मोठा होता की महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा कोणताही दावा करु शकणार नाही. महायुतीच्या या अफाट विजयावर आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संशय घेतला आहे.
महायुतीला राज्यामध्ये 288 जागांपैकी 230 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये एकट्या भाजपला 132 जागा तर अजित पवार गटाला 41 आणि शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत. या अफाट विजयावर आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संशय घेतला आहे. 2014 मध्ये मोदी लाट होती. त्यावेळी आम्ही 42 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये पुलवामा सारख्या घटना घडल्या. त्यावेळी दोन आकड्यांपर्यंत काँग्रेस जाणार नाही, असे सांगितले गेले. आम्ही 44 जागा जिंकल्या. आता आम्हाला 16 जागा मिळाल्या. सरकारच्या विरोधात वातावरण होते. त्यानंतर आम्हाला अपयश आहे. त्यामुळे लोकांनाच प्रश्न पडला आहे, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लाडकी बहीण योजना फळाला आली असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या पूर्वी घोषित केलेल्या या योजनेमुळे महिलांची मते महायुतीला मिळाली असल्याचे बोलले जात आहे. याचा महायुतीने मोठा प्रचार देखील केला. तसेच आता निवडणुकीनंतर महायुती सरकार हे 2100 रुपये दर महिना देत असल्याचे सांगितले आहे. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी संशय घेतला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “सरकारच्या विरोधात लोकांचा एवढा आक्रोश असताना लाडकी बहीणच्या नावाने पाच टक्के मते फिरलीही असतील का? लाडकी बहीण सामोर करून दुसरा प्रयोग तर केला गेला नाही ना?” असा संशय विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच नाना पटोले प्रदेशाध्यक्षाच्या राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या बातमीवर ते म्हणाले, “मला आत्ता अशी माहिती मिळली आहे. आता त्यांची भूमिका काय आहे, त्याची मी माहिती घेत आहे. सध्या मला पूर्ण माहिती नाही, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. पुढे वडेट्टीवार म्हणाले की, भाजपने छोटे राज्य द्यायचे आणि मोठा राज्य बळकवणे, असा प्रकार सुरु केला आहे. लोकांना सांगायचे ईव्हीएम त्या ठिकाणी नाही का? हा भाजप महायुतीचा विजय नाही तर ईव्हीएमचा विजय दिसत आहे. कोणी कितीही दावा केला तरी विजय ईव्हीएमचा आहे,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.