File Photo : Sharad Pawar
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. निवडणूक आयोगाने मागील महिन्यामध्ये निवडणूक जाहीर केली. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करुन निकाल दिला जाणार आहे. बंडखोरीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे ही प्रतिष्ठेची झाली आहे. आता जेष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा घणाघात शरद पवार यांनी केला आहे.
महायुतीमध्ये नाशिकमधील काही जागांवर मतभेद असल्याचं दिसत आहे. नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ आणि देवळालीत आमदार सरोज अहिरे यांना मैदानात उतरवले आहे. महायुतीत जागा वाटपाच्या चर्चेत देवळाली आणि दिंडोरीच्या जागेवर शिंदे गटाने दावा केला होता. मात्र जागा वाटपात हे मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्यामुळे अखेरच्या दिवशी शिंदे गटाने मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एबी फॉर्म चार्टर्ड प्लेनने नाशिकला पाठवले आहेत. याची आता चौकशी केली जाणार आहे. यावर आता शऱद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, “असा अनेक गोष्टी घडत आहेत. या सरकारचे वैशिष्ट्य आहे. विमानाने एबी फॉर्म पाठवला. आम्ही अनेक जिल्ह्यांमधून ऐकत आहोत, काही अधिकाऱ्यांकडून ऐकत आहोत की, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पुरवली जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये, अशी गळ घातली आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती असती तर मी याबाबत वाटेल ते केले असते. मात्र माझा स्वभाव आहे की, पूर्ण माहितीशिवाय मी भाष्य करत नाही,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : 25 नोव्हेंबरपासून सुरु होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन, हे मुद्दे गाजणार
पवार कुटुंबाचे दोन दिवाळी पाडवा
राजकीय विचार वेगळे झाल्यामुळे अजित पवार यांनी पक्षांमधून बाहेर पडत महायुतीमध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादी पक्षावर त्यांनी दावा करुन पक्ष व चिन्ह घेतले. यानंतर आता ही नाराजी आता कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. अजित पवार यांनी पहिल्यांदा वेगळा दिवाळी पाडवा केला आहे. शरद पवार यांचा पाडवा गोविंदबागेमध्ये तर अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीमध्ये साजरा करण्यात आला. यामुळे पहिल्यांदा पवार कुटुंबाचे दोन वेगळे पाडवे साजरे करण्यात आले.