File Photo : Sangola
सोलापूर / शेखर गोतसुर्वे : शेकापच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे गटात कडवी झुंज लागली आहे. सांगोल्यात तिरंगी लढत होत असून, शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे-पाटील, डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा सभेसह झंझावती दौरा पार पाडत आहेत.
गेल्या 55 वर्षांपासून शेकापचे सांगोला विधानसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होते. स्वर्गीय गणपतआबा देशमुख यांनी बालेकिल्ला मजबूत ठेवला होता. २०१९ विधानसभा निवडणुकीत सत्ता उलथवून लावण्यात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना अखेर यश मिळाले होते. अटीतटीच्या लढतीत आ. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा केवळ ७६८ मतांनी पराभव करत निसटता विजय मिळविला होता.
शहाजीबापू पाटील यांना ९९ हजार ४६४ तर अनिकेत देशमुख यांना ९८ हजार ६९६ मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीची रणधुमाळीत उबाठा गटाने शिवसेना शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. उबाठा गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांना उमेदवारी देत दंड थोपटले आहे. तर काय झाडी, काय डोंगर फेम शिंदे गटातील उमेदवार शहाजी बापू पाटील मैदान गाजवत आहेत. अनिकेत देशमुख शेकापकडून यंदा निवडणूक रिंगणात उभे नाहीत. त्यांच्या जागी बंधू बाबासाहेब देशमुख उभे आहेत.
गणपतराव देशमुख यांचा पराभव करून विधानसभेत
सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि गणपतराव देशमुख हे समीकरण संपूर्ण राज्याने पाहिले आहे. १९६२ पासून गणपतराव देशमुख सलग या मतदारसंघातून निवडून येत होते. पण शहाजी पाटील यांनी १९९५ साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. फक्त १९२ मतांनी ते निवडून आले होते.
१९९५ सालचा एक विजय सोडला तर शहाजी पाटील यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागलं. १९९५ नंतर १९९९, २००४, २००९ असे सलग पराभव त्यांनी स्वीकारले.
सलग चार पराभव
अखेर २०१४ च्या विधानसभेपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण तरीही त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यांनतर शहाजी पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकीमुळे भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. २०१९ विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गणपतराव देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याशी त्यांची लढत झाली त्यात ते विजयी झाले.
आघाडीत बिघाडी
सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाली आहे. कारण, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापने सांगोल्याच्या जागेवर दावा केला होता. बाबासाहेब देशमुख हे या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र, महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे पाटील यांना उबाठा गटाने उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे.
आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने
सांगोला मतदारसंघात प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत मानली जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रणांगणांत आमने आले आहेत. जोरदार सभा आणि भाषणाने येथील वातावरण ढवळून निघाले आहे. संपूर्ण राज्यात या लढतीने लक्ष वेधले आहे.
हेदेखील वाचा : राज्यात बॅग्स तपासणीचा मुद्दा तापला; कराड विमानतळावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बॅगेची तपासणी