नरेंद्र मोदींचे भाजप कार्यकर्त्यांना निर्देश (फोटो- यूट्यूब)
सासवड: काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीच्या पुण्यातील सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस चांगलाच रंग चढत आहे. पुरंदरमधील महायुतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी परिवर्तन घडविण्याचा जोरदार चंग बांधला आहे. यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवीत आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत पुरंदरचे महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांना निवडून देण्याचे जाहीर आवाहन केले आहे. विशेष म्हणजे सासवडमधील भाजपच्या काही नेत्यांनी मात्र शिवतारे यांना पाठींबा देणार नसल्याचे दोन दिवसापूर्वीच जाहीर केले. त्यानंतर लगेचच पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय शिवतारे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार अडचणीत येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सासवडमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या अडचणी यामुळे नक्की वाढणार अशी चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सासवडला झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात विजय शिवतारे हेच उमेदवार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या काळात काही कारणांमुळे शिवतारे यांची उमेदवारी जाहीर करण्यास वेळ लागला, मात्र शिवतारे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे महायुतीतील शिवसेना तसेच भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात आले आहे. एवढेच काय पण सध्या पुरंदरमध्ये शिवतारे यांच्या सोबत शिवसेनेतील सर्व नेत्यांसह भाजपचे माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुरंदर हवेली समन्वयक बाबाराजे जाधवराव, भाजप तालुका अध्यक्ष निलेश जगताप, भानुकाका जगताप, सासवड शहरप्रमुख साकेत जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतारे यांच्या प्रचारात अहोरात्र झटत आहेत.
हेही वाचा: “आमच्या वारकऱ्यांसाठी ही आमची…”; पालखी मार्गाबाबत पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महत्वाचे विधान
मात्र असे असताना आम्हाला शिवतारे विचारीत सुद्धा नाहीत असा आरोप करीत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेवून शिवतारे यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवतारे यांचा प्रचार करणार नाही वेळ पडल्यास घरी बसू किंवा इतर तालुक्यातील भाजप उमेदवारांचा प्रचार करू असे जाहीर केले. पत्रकार परिषद झाल्यानंतर सोशेल मिडिया आणि वृत्तपत्रांनी दखल घेतली असली तरी खुद्द शिवतारे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली दिसून येत नाही. एवढेच नाही तर भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याने त्यांची समजूत घातल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे सध्या निवडणूक कालावधी असल्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता वेळ मारून नेण्यात येत असून निवडणूक निकाल झाल्यानंतर भाजपकडून कारवाई होण्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार असताना प्रचारात सहभागी न होता पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांना निवडणुकीनंतर मात्र दणका बसण्याची शक्यता माहितीगार सूत्रांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: पुण्याला “कनेक्टीव्हिटी” शहर बनवणार..! प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले वचन
‘मतभेद बाजूला ठेवून प्रयत्न सुरु’
विजय शिवतारे हे पुरंदर मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. आम्हाला पक्षाकडून शिवतारे यांचा प्रचार करणे आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा सक्त सूचना आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी आमच्यातील काही मतभेद असतील तर बाजूला ठेवून प्रत्येक उमेदवार निवडून कसा येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे महायुतीचा एकही व्यक्ती पक्षविरोधी काम करणार नाही. जे चुकीचे काम करतील त्यांच्याबाबत निवडणुकीनंतर पक्षनेते योग्य ते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे.