लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांची जोडी खूप लोकप्रिय होती. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले. ते दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा जीवनप्रवास मांडणाऱ्या ‘डॅम ईट आणि बरंच काही’ (Damn It Ani Barach Kahi) या पुस्तकाचे प्रकाशन दादर येथील श्री शिवाजी मंदिरमधील भव्य सभागृहात ११ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकत महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अनेक आठवणी वाचायला मिळणार आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी महेश कोठारेंनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढली.
[read_also content=”ट्रेंडच्या नादापायी हे काय चाललंय राव, अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर कपडे…, बोल्ड Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम https://www.navarashtra.com/viral/shivangi-verma-followed-insta-grwm-trend-and-chenged-clothes-infront-fo-camera-nrsr-361171.html”]
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल महेश कोठारे म्हणाले, “लक्ष्मीकांत बेर्डे आणि माझी ओळख, आमची मैत्री, त्याच्याबरोबरच्या काही आठवणी असं बरंच काही मी या पुस्तकात लिहिलेलं आहे. तो माझा इतका जवळचा मित्र आहे आणि लक्ष्या आजही माझ्याबरोबरच असल्यासारखं मला वाटतं.”
यावेळी महेश कोठारे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा दिवस आहे. तुम्ही सर्वांनी इथे येऊन मला आशीर्वाद दिले याचा खूप खूप आनंद आहे. देवेंद्रजींचा ऋणी आहे. या पुस्तकाद्वारे मी माझं संपूर्ण जीवन सर्वांसमोर आणलं आहे. यात माझ्या जीवनातील चढ-उतार आण संघर्ष आहे. माझ्या आयुष्यात एक भयंकर काळ होता. त्या काळातही काही लोकं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तीसुद्धा आज इथे हजर आहेत. किशोर अग्रहाळकर, लंडनमधील साजीद शेख, मच्छिंद्र चाटे असे अनेक लोक आहेत, जे त्यावेळी माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून महेश कोठारे आज हे पुस्तक घेऊन तुमच्यासमोर येऊ शकला. हे पुस्तक म्हणजे संपूर्ण जर्नी आहे. कुठल्याही तरुण-तरुणींना कोणत्याही क्षेत्रांत जर यश मिळवायचं असेल, तर त्याला या पुस्तकातून नक्कीच एक प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. त्यासाठीच हे पुस्तक लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महेश कोठारे यांचा ‘धुमधडाका’ प्रदर्शित झाला तेव्हा मी दहावीत शिकत होतो. मी नागपूरचा असल्याने तिकडे सिनेमे थोडे उशीरा पहायला मिळायचे. ‘धुमधडाका’ या चित्रपटासोबतच कोठारे यांच्या सर्वच चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवली. महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यामुळे मराठी सिनेमाचा गोडवा लागला. मराठी सिनेमाचा कायापालट करून नव्या पिढीला जोडण्याचे काम महेश कोठारेंनी केले आहे. मंदार जोशी यांनी त्यांचे सुरेख चरित्र लिहिले आहे. ‘डॅम इट’चा जन्म कसा झाला हेदेखील या पुस्तकात वाचायला मिळाले. उत्सुकता वाढवणारे हे पुस्तक वाचताना खाली ठेवूच नये असे वाटते. कोठारे यांचे मनोरंजन विश्वातील योगदान अतुलनीय आहे. कोठारेंनी मराठीत नावीन्यपूर्ण प्रयोग केल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘डॅम इट आणि बरंच काही’ या पुस्तक निर्मितीच्या माध्यमातून कोठारेंच्याआड दडलेला स्टारडममधील माणूस पाहता आल्याचे अखिल मेहता म्हणाले.
मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या ‘डॅम ईट आणि बरंच काही’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महेश कोठारे, मेहता पब्लिकेशनचे अखिल मेहता, बँक ऑफ महाराष्ट्रचे आशिष पांडे, पुस्तकाचे लेखक,पत्रकार तारांगणचे संपादक मंदार जोशी उपस्थित होते. याखेरीज किरण शांताराम, सचिन पिळगावकर, निवेदिता सराफ, मच्छिंद्र चाटे, जयवंत वाडकर, रामदास पाध्ये, उमेश जाधव आदी मंडळीही हजर होती. देवेंद्र फडणवीस यांनी रिमोटचे बटण दाबून अनोख्या शैलीत ‘डॅम ईट आणि बरंच काही’ पुस्तकाचे प्रकाशन केले.
सचिन पिळगावकर, महेश कोठारे, निवेदिता सराफ आणि आदिनाथ कोठारे यांचा गप्पांचा फडही या सोहळ्यात रंगला. निवेदिता यांनी कोठारेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिलाच, पण त्यासोबतच पुस्तकातील काही किस्सेही वाचून दाखवले.
सचिन पिळगावकर म्हणाले की, समोर स्पर्धा करणारी व्यक्ती नसेल तर स्पर्धा होऊ शकत नाही. स्वतःची वेगळी शैली असलेल्या प्रतिस्पर्ध्याबद्दलही मनात आपुलकी असते. ती नेहमीच महेशबाबत वाटली. आम्ही कायम पडद्यामागे खूप चांगले मित्र राहिलो आहोत. लोकांना आम्ही प्रतिस्पर्धी असल्याचा आनंद मिळायचा पण आम्ही मात्र आपापल्या चित्रपटांच्या सिल्व्हर-गोल्डन ज्युबिली होण्याचा आनंद साजरा करायचो. माझ्या यशात महेश सामील व्हायचा आणि त्याच्या आनंदात मी नेहमी सहभागी व्हायचो.
गजमुखा करतो जयजयकार… या गाण्याने पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी…, चिकी चिकी बुबुम बुम…, ही दोस्ती तुटायची नाय… ही कोठारेंची गाजलेली गाणी सादर करण्यात आली. कुबड्या खविस, टकलू हैवान, तात्या विंचू, कवठ्या महांकाळ हे कोठारेंच्या सिनेमातील खलनायकही अवतरले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन आदीनाथ कोठारे, उर्मिला कोठारे आणि रोहित हळदीकर यांनी केले.