उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात, धाराशिव तालुक्यात २५ उमेदवारांची माघार
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राज्यात नगरपालिका, महानगरपालिकानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी होती. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १४६२ जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण ७६९५ अर्ज दाखल झाले आहेत. पंचायत समितीच्या १४६२ जागांसाठी असे १३०२३ रेकॉर्डब्रेक अर्ज दाखल झाले आहेत. फक्त १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका होत आहेत. या जांगासाठी पाच फ्रेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
जिल्हा परिषदेसाठी धाराशिवमध्ये सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. येथे जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सुमारे ९६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. धाराशिव पाठोपाठ कोल्हापूरमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अर्ज दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी ९०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी ८५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वात कमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ५६ जागांसाठी २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
याचदरम्यान धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याची मुदत २७ जानेवारीपर्यंत असून शुक्रवारी २३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतून १३ उमेदवारांनी आपली उमेदवारी माघारी घेतली आहे. तर एका गटातील उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. जिल्यातील पंचायत समिती गणांतून १२ उमेदवारांनी आपली उमेदवारी माघारी घेतली आहे.
धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातून ९ उमेदवारांनी, तुळजापूर, भूम, परंडा आणि लोहारा तालुक्यातील प्रत्येकी एका उमेदवाराने आपली उमेदवारी माघारी घेतली आहे. धाराशिव तालुक्यातील पंचायत समिती गणांतून ३ उमेदवारांनी, तुळजापूर तालुक्यातील २ उमेदवारांनी, लोहारा तालुक्यातील ३ उमेदवारांनी आणि भूम, परंडा, उमरगा, वाशी या तालुक्यातील पंचायत समिती गणांतून प्रत्येकी एकाने आपली उमेदवारी मागे घेतली आहे. असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.






