संग्रहित फोटो
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ८४ नगरसेवक निवडून आणत एकहाती निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे. विरोधकांना नाममात्र जागांवर रोखत भाजपने शहराच्या सत्तेची सूत्रे पूर्णतः आपल्या हातात घेतली असली, तरी आता खरी लढाई महापौरपदासाठी सुरू झाली आहे. यंदा सर्वसाधारण महापौर आरक्षण असल्याने भाजपच्या ८४ नगरसेवकांपैकी कोणीही महापौर होऊ शकतो आणि याच शक्यतेमुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.
निवडणूक निकालानंतर अवघ्या काही दिवसांत इच्छुक नगरसेवकांची वरिष्ठ नेत्यांकडे रांग, थेट भेटी, सततची फोनफोनी, लॉबिंग आणि शिफारसींचे सत्र सुरू झाले आहे. “आमच्याच गटाला संधी द्या”, “आमचा उमेदवार अधिक सक्षम”, “प्रादेशिक समतोल हवा”, अशा विविध मुद्द्यांवरून पक्षनेतृत्वावर दबाव वाढत आहे. सत्तेचा मोठा आकडा हातात असतानाही महापौरपदाचा निर्णय सोपा राहिलेला नाही, हे स्पष्ट दिसते.
महापौर चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभा मतदारसंघातून? हा प्रश्न सध्या केंद्रस्थानी आहे. शहरातील राजकीय समतोल, आगामी विधानसभा तयारी आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव, या तिन्ही बाबी लक्षात घेऊन अंतिम निर्णय होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे तीनही विधानसभा मतदारसंघांतील नेते आपापल्या पातळीवर ताकद आजमावत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमा खापरे या चारही नेत्यांच्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणाच्या समर्थकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, यावरच पुढील शहरकारभाराची दिशा ठरणार आहे.
प्रत्येक आमदार आपल्या-आपल्या गटासाठी वजन टाकत असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. भाजपच्या विजयामागे संघटनात्मक ताकद, केंद्र व राज्यातील सत्ता आणि स्थानिक पातळीवरील कामगिरी कारणीभूत ठरली असली, तरी अंतर्गत स्पर्धा आणि गटबाजी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे नेतृत्वाने कठोर पण संतुलित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारा, प्रशासकीय अनुभव असलेला आणि पक्षशिस्त पाळणारा चेहरा महापौरपदी हवा, ही मागणी आता जोर धरू लागली आहे.
आकड्यांची ताकद दाखवण्यापेक्षा क्षमता आणि विश्वासार्हता यांना प्राधान्य दिले जाणार का, हा खरा कस आहे. एकंदरीत, ८४ नगरसेवकांची सत्ता मिळवूनही भाजपसमोरचा महापौरपदाचा पेच निर्माण झालेला आहे. निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो, आणि कोणत्या विधानसभा मतदारसंघाला मान मिळतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






