फोटो सौजन्य - Social Media
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शलाका पवारने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ‘मर्डर मेस्त्री’, ‘ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘इरादा पक्का’, ‘गोठ’, ‘तू चांदणे शिंपीत जाशी’ आणि ‘का रे दुरावा’ यांसारख्या गाजलेल्या कलाकृतींमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शलाकाने तिच्या सहकलाकारांबद्दल, मैत्रीबद्दल आणि अभिनेता समीर चौगुलेसोबतच्या जुन्या आठवणींबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.
मुलाखतीत शलाका म्हणाली की, नाटकाच्या क्षेत्रात काम करताना जुळलेली नाती आजही तितकीच घट्ट आहेत. “आमच्या ‘यदा कदाचित’ नाटकातील कलाकारांशी रोज संपर्क होत नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो. मात्र, जेव्हा भेट होते तेव्हा जुनाच जिव्हाळा आणि आपुलकी जाणवते. राकेश जाधव, पौर्णिमा अहिरे, सीमा रेणके, सागर कारंडे आणि इतर अनेक कलाकारांशी आजही चांगले संबंध आहेत,” असे तिने सांगितले. याचवेळी तिने अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्याबद्दल विशेष भावना व्यक्त केल्या. “किशोरी अंबिये माझ्यापेक्षा खूप सीनियर आहेत. पण त्यांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं. त्या माझ्या कुटुंबातील सदस्य असल्यासारख्या आहेत. मी त्यांना माझ्या नणंदेसारखं मानते,” असे शलाका म्हणाली.
मुलाखतीदरम्यान तिला समीर चौगुलेबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. विशेषतः ‘फू बाई फू’मधील त्यांच्या लोकप्रिय जोडीबद्दल आणि आज समीरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पाहताना काय वाटतं, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर शलाका म्हणाली, “समीर माझा खूप चांगला मित्र आहे. आज आमचा पूर्वीसारखा सतत संपर्क नसला तरी एकमेकांबद्दलचा जिव्हाळा कायम आहे. त्याची पत्नी कविता हिच्यासोबतही माझी खूप चांगली मैत्री आहे.”
समीरच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना ती म्हणाली, “तो मला माणूस म्हणून खूप आवडतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. त्याच्यासोबत काम करताना खूप सुंदर आठवणी तयार झाल्या. आज तो ज्या उंचीवर पोहोचला आहे, ते पाहून खूप अभिमान वाटतो.” समीरच्या यशाबद्दल बोलताना शलाका म्हणाली, “आज समीर एक मोठा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याचे एकपात्री प्रयोग प्रचंड लोकप्रिय आहेत. परदेशातही त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. माझे नातेवाईकही मला म्हणतात की, ‘समीर तुमच्याकडे यायचा, आज तो किती मोठा झाला आहे.’ हे ऐकून खूप आनंद होतो. त्याचं यश पाहून मला मनापासून समाधान वाटतं.”
यावेळी तिने ‘फू बाई फू’ कार्यक्रमातील एक आठवणही सांगितली. ती म्हणाली, “त्या काळात मला स्पर्धात्मक कार्यक्रमांची फारशी सवय नव्हती. मी अनेकदा घाबरायचे. मला हे जमत नाही, असं म्हणत असायचे. पण समीर नेहमी माझा आत्मविश्वास वाढवायचा. तो मला प्रोत्साहन द्यायचा आणि चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा द्यायचा.” शलाका पुढे म्हणाली, “एकदा आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. मला असं वाटलं की माझ्यामुळे समीरचं नुकसान झालं. मी त्याची पार्टनर नसते तर कदाचित तो आणखी पुढे गेला असता. पण समीरने कधीही तसं वाटू दिलं नाही. तो नेहमी म्हणायचा की, ‘तू खूप छान काम केलंस.’ त्याची पत्नी कवितानेही मला समजावलं.”
ती पुढे म्हणाली, “मला माहीत होतं की समीरमध्ये खूप क्षमता आहे. त्याच्यात स्पर्धा जिंकण्याची जिद्द होती. त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं. त्यामुळे आज त्याला योग्य व्यासपीठ मिळालं आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं, याचा मला खूप आनंद आहे.” दरम्यान, या मुलाखतीत शलाका पवारने ‘फू बाई फू’ कार्यक्रमातील अनेक रंजक आठवणी आणि पडद्यामागचे किस्सेही शेअर केले. तिच्या या आठवणींमधून सहकलाकारांबद्दलचा आदर, मैत्री आणि जिव्हाळा पुन्हा एकदा समोर आला.






