फोटो सौजन्य - Social Media
सध्या ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’मध्ये रागिणी महाजन ही भूमिका साकारणाऱ्या सुषमा मुरुडकर यांनी मुलाखतीत हिंदी मालिकांच्या सेटवर आलेल्या अनुभवांविषयी मनमोकळेपणाने भाष्य केले. हिंदी क्षेत्रात काम करताना मराठी उच्चारांमुळे त्यांना एकदा सर्वांसमोर अपमानास्पद प्रसंगाला सामोरे जावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
सुषमा म्हणाल्या, “मी त्या काळात ‘कुंडली भाग्य’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत काम करत होते. एका दृश्याचे चित्रीकरण सुरू होते. संवाद बोलताना नकळत माझ्या हिंदीमध्ये मराठीचा प्रभाव आला आणि हिंदी-मराठी मिश्रित शब्द उच्चारले गेले. सेटवर त्या वेळी जवळपास २०० लोक उपस्थित होते. दिग्दर्शक दूर बसला होता. त्याने अचानक सर्वांसमोर मला थांबवत ‘तुमची गावठी मराठी नको, एकदम नीट हिंदी बोला’ असे सुनावले.”
हा प्रसंग आठवताच अभिनेत्री म्हणाल्या की, त्या क्षणी त्यांना खूप वाईट वाटले. “माझा अपमान झाल्यासारखे मला वाटले. पण त्या वेळी मी कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त ‘ओके सर’ एवढेच उत्तर दिले. मी शांत राहिले आणि पुढील कामावर लक्ष केंद्रित केले,” असे त्यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या, “त्या घटनेनंतर मी पुढचा शॉट दिला आणि तो अगदी परफेक्ट झाला. हिंदी मालिकांमध्ये काम करताना भाषेच्या उच्चारांशी संबंधित समस्या अनेक कलाकारांना येतात. आपण आपल्या मातृभाषेतून आलेलो असल्याने काही शब्दांमध्ये किंवा संवादांमध्ये त्या भाषेचा प्रभाव दिसून येतो. मात्र, सातत्याने प्रयत्न केल्यास त्यावर मात करता येते.”
हिंदी मालिकांमध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांची हिंदी भाषा अधिक सक्षम झाली. मात्र, त्याचा परिणाम मराठी बोलण्यावर झाला, असेही त्यांनी सांगितले. “मी अनेक वर्षे हिंदी माध्यमात काम करत होते. त्यामुळे माझी हिंदी सुधारली, पण मराठी बोलण्याची शैली आणि उच्चार काहीसे कमकुवत झाले. त्यानंतर जेव्हा मी पुन्हा मराठी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा मला वेगळ्याच प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागला.”
याबाबतचा एक प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, “एका व्यक्तीने मला ‘तू मुक्याची भूमिका चांगली करशील, कारण तुला मराठी स्पष्ट बोलता येत नाही’ असे म्हटले होते. हे ऐकून मला धक्का बसला. मात्र, त्या मालिकेचे निर्माते खूप सकारात्मक विचारांचे होते. त्यांनी मला निराश न होता योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी काही विशेष सरावाच्या पद्धती सांगितल्या. त्यांच्या सल्ल्यानुसार मी मेहनत घेतली आणि हळूहळू माझ्या मराठी उच्चारांमध्ये सुधारणा झाली.”
या संपूर्ण प्रवासात सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यांची मोठी भूमिका असल्याचे सुषमा मुरुडकर यांनी सांगितले. “अशा घटना घडतात तेव्हा मी स्वतःला सतत प्रोत्साहन देते. ‘I Am The Best, I Can Do It’ असे स्वतःला सांगत राहते. नकारात्मक गोष्टींमध्ये अडकून न पडता पुढे जाण्याचा प्रयत्न करते. सकारात्मक विचार आणि स्वतःवरील विश्वास यामुळे अनेक अडथळे पार करता येतात, असा माझा अनुभव आहे,” असे त्या म्हणाल्या.
सुषमा मुरुडकर यांच्या या अनुभवातून भाषेच्या अडचणींवर मात करण्यासाठी चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.






