पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. १० ते १२ जागी निवडणुक लढवणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. तसेच पणजीमधून शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली.
तसेच उद्यापर्यंत तीन जागांची घोषणा करणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्या त्या मतदारसंघातील सामान्य चेहरे आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. आज ९ जागांची यादी जाहीर करत आहोत. गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचाराला येतील. विधानसभेत शिवसेनेचे आमदार जातील, असं राऊत म्हणाले.
प्रत्येक मतदार संघात शिवसेना अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीने निवडणुका लढेल, गोव्यातील राजकारणातून सध्याची जळमट दूर करायची असतील, गोव्यातील आलेमाव गेलेमाव संस्कृती संपवायची असेल तर शिवसेनेचे आमदार गोव्यातील राजकारणात असणं गरजेचं आहे. गोव्याती जनतेचा आवाज, स्थानिकांचे प्रश्न, भ्रष्टाचार, राजकारणातील दंडेलशाही हे सर्व थोपवायचं असेल तर शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायला हवेत, आणि गोव्यातील जनता यावेळी शिवसेनेला संधी देईल अशी मला खात्री आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पत्रकारपरिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा आता काय नवीन पक्ष नाही. आपण मागील काही वर्षांपासून पाहत आहात, जरी निवडणुकीत आम्हाला यश मिळालं नसलं तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करत आहे. गोव्यातील निवडणुका आम्ही २०१७ साली देखील लढवल्या होत्या, यावेळी गोव्याचं राजकारण आणि गोव्याच्या निवडणुका एकंदरीत वातावरण, हे काय फार आशादायी दिसत नाही सगळ्यांसाठीच, गोव्याच्या जनतेसाठी. वातावरण पूर्ण गढूळ झालय, अनेक राजकीय पक्ष नव्याने उतरलेले आहेत. उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत, नक्की कोण कोणत्या पक्षाकडून निवडणुका लढतय? हे देखील स्पष्ट होत नाही.”