फोटो सौजन्य - Social Media
मुंबईत आयोजित ओटीएम २०२५ च्या समारोपात गोवा पर्यटनाने शाश्वत आणि जबाबदार प्रवासाच्या प्रति आपली वचनबद्धता अधोरेखित केली. या प्रतिष्ठित पर्यटन प्रदर्शनात गोव्याने पर्यावरणीय जतन, सांस्कृतिक वारसा आणि सामुदायिक सहभागावर आधारित पुनरुत्पादक पर्यटनाचे महत्त्व सादर केले. गोव्याच्या सादरीकरणात एकादशा तीर्थ सर्किटचा प्रचार प्रमुख आकर्षण ठरला. हा सर्किट प्रवाशांना ११ ऐतिहासिक आणि आध्यात्मिक मंदिरांचा समृद्ध अनुभव देतो. याशिवाय, गोव्याने समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे असलेली आपली विविधता दाखवली. उत्सवांचे चैतन्य, स्थानिक पाककृती, समृद्ध संस्कृती आणि शाश्वत पर्यटनाच्या संधींवर भर देत गोव्याने पर्यटकांना नवीन अनुभव देण्याची तयारी दर्शवली.
गोवा पर्यटनाचे प्रतिनिधी राजेश काळे (उपसंचालक, दक्षिण), प्रविणकुमार फळदेसाई (वरिष्ठ व्यवस्थापक मार्केटिंग, जीटीडीसी) आणि सचिन गाड (माहिती सहाय्यक, डीओटी) यांनी प्रदर्शनात अभ्यागतांशी संवाद साधला. त्यांनी व्यवसायिकांशी मौल्यवान चर्चा करत राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले. ओटीएम २०२५ च्या सहभागामुळे गोव्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळाली. गोवा पर्यटनाला यावेळी ‘सर्वोत्तम सजावट पुरस्कार’ मिळाल्याने त्यांच्या प्रयत्नांना मान्यता मिळाली. हा पुरस्कार फेअरफेस्ट मीडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री गझनफर इब्राहिम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोवा पर्यटनाच्या वतीने राजेश काळे, प्रविणकुमार फळदेसाई आणि सचिन गाड यांनी हा सन्मान स्वीकारला.
गोवा पर्यटन संचालक केदार नाईक यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत ओटीएम २०२५ मधील सहभागाला महत्त्वपूर्ण ठरले असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले, “ओटीएम २०२५ मध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्हाला अपार आनंद झाला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठामुळे आम्हाला जागतिक पर्यटन व्यावसायिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यामुळे गोवा पुनरुत्पादक आणि शाश्वत पर्यटनाचे केंद्र कसे बनत आहे, हे प्रभावीपणे सादर करता आले.” कार्यक्रमादरम्यान, पर्यावरणीय पर्यटनाच्या भविष्यासंदर्भात आणि जबाबदार प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या नवकल्पनांबाबत अर्थपूर्ण चर्चा घडून आल्या. या चर्चांमध्ये पर्यटन विकास आणि पर्यावरणीय संवर्धन यांच्यातील संतुलन कसे राखता येईल यावर विशेष भर देण्यात आला. शाश्वत पर्यटन धोरणे, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि तंत्रज्ञानाच्या सर्जनशील उपयोगाबाबत नवे दृष्टिकोन मांडले गेले.
याशिवाय, असंख्य नेटवर्किंग सत्रांमुळे भागीदारी दृढ होऊन व्यवसायिकांना आपापल्या संधी विस्तारण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले. गोव्याच्या प्रतिनिधींनी पर्यावरणपूरक उपक्रम, सांस्कृतिक वारसा संवर्धन, तसेच समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटन व्यवस्थापन या क्षेत्रांतील त्यांच्या यशस्वी प्रयत्नांवर प्रकाश टाकला. ओटीएम २०२५ मधील गोव्याच्या सहभागाने जबाबदार आणि पुनरुत्पादक पर्यटनाला चालना दिली असून, राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी एका नवीन युगाची सुरुवात केली आहे.