काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाला स्थगिती; अंतर्गत कुरघोड्या चव्हाट्यावर
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान : विधानसभा निवडणुकी दरम्यान रिक्त झालेले काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. माजी जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी राजीनामा दिल्याने ही पद रिक्त होते. अंतर्गत कुरघोड्यांमुळे या पदावर काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना नेमणूक करता आली नव्हती. मात्र पालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईतील जून कार्यकर्ते अरविंद नाईक यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ टाकल्याने, नवी मुंबईतील काँग्रेसचे जुनेजाणते पदाधिकारी नाराज झाले होते. अखेर हा विषय दिल्लीत गेल्याने काँग्रेस हायकमांडने या पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिल्याने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील सावळा गोंधळ पुढे आला असून, अंतर्गत कुरघोड्यानी डोके वर काढले आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी राजीनामा देत थेट फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. अनिल कौशिक यांनी राजीनामा दिल्याने युवक प्रदेश उपाध्यक्ष पदी असलेले अनिकेत म्हात्रे यांनी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र त्यांना डावलत थेट वाशीतील ज्येष्ठ पदाधिकारी अरविंद नाईक यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या नियुक्तीवर काँग्रेसमधूनच नाराजीचा सूर लावला गेला.नवनियुक्त जिल्हाध्यक्षानी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांची असलेली अनुपस्थिती नाराजी दाखवून गेली. असे असताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक यांना ही बाजू संभाळून घेताना तारेवरची कसरत करावी लागली.
दुसरीकडे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी थेट पक्ष श्रेष्ठींवर पैसे घेऊन पदे वाटप केल्याचे, तसेच विरोधकांकडून पैसे घेऊन विधानसभेला पुत्र अनिकेत म्हात्रे यांना तिकीट नाकारण्याचा आरोप केला आहे. याविषयीची तक्रार रमाकांत म्हात्रे व अनिकेत म्हात्रे यांनी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांकडे तसेच दिल्लीत देखील केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवात नवी मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांना देखील अरविंद नाईक यांची झालेली नियुक्ती पटलेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून देखील प्रदेश पातळीवर ही नेमणूक चुकीच्या पद्धतीने केली गेल्याच्या तक्रारी केल्या गेल्याची माहिती मिळत आहे. अखेर राज्यात व नवी मुंबईत घडणाऱ्या या घटनांवर थेट दिल्लीला लक्ष द्यावे लागले आहे. थेट दिल्लीतून प्रदेश पातळीवर नवी मुंबईसह इतर जिल्ह्यात केलेल्या नेमणुकाना स्थगिती देण्यात आली आहे. तसे पत्र सध्या चर्चेत आहे.
माजी महापौर रमाकांत म्हात्रे, त्यांच्या पत्नी माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, युवक प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे तसेच त्यांचे समर्थक नगरसेवक व पदाधिकारी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. नुकतीच रमाकांत म्हात्रे व अनिकेत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मुख्य म्हणजे रमाकांत म्हात्रे यांच्यासोबत त्यांचे समर्थक नगरसेवक देखील काँग्रेस पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण नवी मुंबईत तयार झालेली युवकांची मोठी फळी शिंदे सेनेत प्रवेश करू शकते. दुसरीकडे शिंदे गटाची नवी मुंबईत ताकद वाढलेली आहे. तर दुसरीकडे राज्यातील डळमळीत झालेली स्थिती व नवी मुंबईत नेतृत्वहीन झालेला पक्ष पाहता काँग्रेसचा वाशीतील आणखी एक बडा नेता देखील शिंदे सेनेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.