गोव्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या चर्चेमुळे गोव्यातही महाविकास आघाडीसारखा प्रयोग होणार का याबद्दल शक्यतांना उधाण आलं आहे. या संदर्भात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं असून यात त्यांनी गोवा काँग्रेस सोबत आघाडीच्या चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यात बैठक झाली. शिवसेनेचे निवडणूक प्रभारी संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. आज संध्याकाळी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी बातचीत केली.
आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव
दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली. pic.twitter.com/FYO629eX2h— Sanjay Raut (@rautsanjay61) January 3, 2022
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव, दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, गोवा विधानसभेसाठी उत्तर गोवामधील मराठी बहूल अशा ७ विधान सभा मतदारसंघामधील जागासाठी शिवसेना आग्रही असल्याचीही माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीकडून सुद्धा गोव्यात पक्ष मजबूत करण्यावर कल आहे. अलीकडे दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. त्यावेळी गोव्यासह विविध राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पावले उचलावी, याबाबत चर्चा झाली होती.