गोव्यात शिवसेनेने काँग्रेसपुढे निवडणूकपूर्व आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले,’ अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी दिली होती. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, मी काल पणजीत होतो. मी याबाबत राहुल गांधी यांनाही सांगितलं. प्रियांका गांधी यांच्याशीही बोलणे झाले. तेथील काँग्रेसचे काही नेते आहेत, त्यांच्याशीही बोलणे झाले. मात्र, स्वबळावर सत्ता स्थापन करू, असे तेथील स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, इतका कॉन्फिडन्स त्यांच्याकडे येतो कुठून? अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली. इतका जर कॉन्फिडन्स असेल तर, आम्हालाही त्यांच्याकडून थोडा उधार घ्यावा लागेल, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.
उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गोव्यात विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातवारण चांगलेच तापले आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.
भाजपने ३४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्या सर्वांचं चारित्र्य शिवसेनेकडे आहे. गोव्यात जाऊन त्यांचा पर्दाफाश करेल. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजप वाढवला. पार्सेकर हे मांद्र्यातून पहिल्यांदा लढले तेव्हा त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. तरीही ते पुन्हा लढले आणि हरले. पण त्यांनी पक्ष वाढवला. आज तेही म्हणतात पैसे देऊ शकलो नाही म्हणून भाजपने उमेदवारी नाकारली, असं त्यांनी सांगितलं.