फोटो सौजन्य - Social Media
सिकल सेल बीटा थॅलेसेमिया हा एक दुर्मिळ पण गंभीर आनुवंशिक रक्तविकार असून, एका पालकाकडून सिकल सेल जनुक (HbS) आणि दुसऱ्या पालकाकडून बीटा-थॅलेसेमिया जनुक वारशाने मिळाल्यामुळे हा आजार होतो. या विकारामुळे शरीरात असामान्य हिमोग्लोबिन तयार होते. परिणामी तीव्र रक्तक्षय (ॲनिमिया), सतत वेदनांचे झटके, संसर्गाचा धोका आणि लहान वयातच गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात. संबंधित मुलाला लहानपणापासूनच वारंवार रक्त चढवावे लागत होते. तीव्र वेदना आणि प्रकृती खालावल्याने त्याला अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागत होते. दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपचारांच्या शोधात कुटुंबाने अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे धाव घेतली. सखोल तपासण्या व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मूल्यमापनानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाच एकमेव क्युरेटिव्ह (पूर्ण बरे करणारा) पर्याय असल्याचे निश्चित करण्यात आले.
मात्र, पूर्णपणे जुळणारा (फुली मॅच्ड) दाता उपलब्ध नसल्याने वैद्यकीय पथकाने अंशतः जुळणाऱ्या कौटुंबिक दात्याकडून ‘हॅप्लो-आइडेंटिकल स्टेम सेल ट्रान्सप्लांट’ करण्याचा निर्णय घेतला. हा अत्यंत जोखमीचा आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा उपचार एप्रिल २०२५ मध्ये यशस्वीरित्या पार पडला. प्रत्यारोपणानंतर मुलामध्ये ‘सीएमव्ही रिएक्टिव्हेशन’ तसेच तीव्र ‘गट ग्राफ्ट वर्सेस होस्ट डिसीज’ (GVHD) निर्माण झाली. यामुळे पोटदुखी, जुलाब आणि रक्तस्त्राव अशी गंभीर लक्षणे दिसून आली. प्रारंभी दिलेल्या स्टिरॉइड उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने ही अवस्था ‘स्टिरॉइड-रिफ्रॅक्टरी ग्रेड ४ गट GVHD’ मध्ये रूपांतरित झाली, जी जीवघेणी ठरू शकते.
या टप्प्यावर प्रगत इम्युनोसप्रेशन थेरपी, संसर्ग नियंत्रण, सतत देखरेख आणि आवश्यक अवयव आधार (ऑर्गन सपोर्ट) यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय उपचार तातडीने सुरू करण्यात आले. मल्टी-डिसिप्लिनरी वैद्यकीय पथकाच्या वेळेवर आणि अचूक हस्तक्षेपामुळे मुलाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली. अखेर जुलै २०२५ मध्ये त्याला स्थिर प्रकृतीत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हे प्रत्यारोपण अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने केले असून, त्यामध्ये डॉ. विपिन खंडेलवाल, डॉ. पुनीत जैन, डॉ. दिपाली पाटील, डॉ. प्रज्ञा आणि डॉ. अमेय सोनावणे (अपोलो चिल्ड्रन्स, नवी मुंबई) यांचा समावेश होता. पूर्णपणे जुळणारा दाता उपलब्ध नसतानाही हॅप्लो-आइडेंटिकल ट्रान्सप्लांटद्वारे मिळालेले हे यश बालरोग अस्थिमज्जा प्रत्यारोपणातील अपोलो हॉस्पिटल्सच्या प्रगत वैद्यकीय कौशल्याचे आणि उच्च जोखमीच्या गुंतागुंती हाताळण्याच्या क्षमतेचे प्रभावी उदाहरण ठरत आहे.






