6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून..., मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या
कळंबोलीत राहणारी सुप्रिया प्रमोद म्हामुनकर (वय ३० वर्षे) हिला पहिलं अपत्य मुलगी झाल्यापासून ती असमाधानी होती. मुलगी नको असल्याची भावना तिच्या मनात खोलवर रुजली होती. या कारणावरून ती मुलीशी वारंवार तिरस्काराने वागत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी घरात कोणीही नसताना सुप्रियाने आपल्या सहा वर्षांच्या मुलीचे नाक व तोंड दाबून श्वास रोखला, तसेच मऊ व बोथट वस्तूने तिच्या ओटीपोटावर दाब देऊन तिची हत्या केली. प्राथमिक तपासात हा खून पूर्वनियोजित नसला, तरी दीर्घकाळ मनात असलेल्या द्वेषातूनच हा अमानुष कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुलगी नीट बोलत नसणे आणि सतत हिंदी भाषेत बोलणे यासारखी क्षुल्लक कारणे देत आरोपी आई मुलीवर राग काढत होती. या निर्दयी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मायलेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. चौकशीअंती आरोपी सुप्रिया म्हामुनकर हिला अटक करण्यात आली असून, भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भारत देशात नारीशक्तीची पूजा केली जाते. नवरात्रीत कुमारी पूजन केले जाते, महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे आणि देशाच्या सर्वोच्च पदावर महिला राष्ट्रपती विराजमान आहेत. अशा काळात घडलेली ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी असून, स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलगी नको या मानसिकतेविरुद्ध अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे अधोरेखित करते. या हृदयद्रावक घटनेमुळे कळंबोलीसह संपूर्ण नवी मुंबई परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






