इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायलमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेऊन भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत २१२ भारतीय परत आले आहेत. आज सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण २१२ भारतीयांचा समावेश आहे.
मायदेशात परताच या भारतीयांनी सुटकेचा श्वास सोडला असून, मोदी सरकारचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर या नागरिकांचे स्वागत केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय वंशाचे लोक
खरं तर, ७ ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर, एअर इंडियाने इस्रायलमधून आपली सर्व उड्डाणे तात्काळ बंद केली होती. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. त्यासाठी गुरुवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, इस्रायलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय वंशाचे लोक राहतात. त्यांना परत आणले जाणार आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार इस्रायलमधून ज्या लोकांना आणत आहे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाडे घेतले जात नाही. दरम्यान, भारतात येणार्या विमानांमध्ये चढण्यासाठी इस्रायलमधील तेल अवीव विमानतळावर भारतीयांनी गर्दी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.






