कुबेरेश्वर धाममध्ये पुन्हा मोठी दुर्घटना; कावड यात्रेत सहभागी झालेल्या चार भाविकांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र आहे. परंतु गेल्या दोन दिवसांत इथे मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या कावड यात्रेदरम्यान, गर्दी आणि अस्वस्थतेमुळे चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. या यात्रेत देशभरातून सुमारे पाच लाख भाविक सहभागी झाले होते.
उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; ढगफुटी नंतर गावावर कोसळली दरड, २० सेकंदात सर्वकाही उदध्वस्त
कुबेरेश्वर धाम हे भगवान शंकराला समर्पित एक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ मानले जाते. येथे दरवर्षी लाखो भक्त रुद्राक्ष प्राप्तीसाठी तसेच शिवभक्तीच्या हेतूने गर्दी करतात. यंदाची कावड यात्रा विशेष भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. यात्रेचा मार्ग सीवन नदीपासून कुबेरेश्वर धामपर्यंत निश्चित करण्यात आला होता. पण, या भव्य आयोजनात आवश्यक ती नियोजनशीर व्यवस्था न झाल्यामुळे गर्दीचा ताण आणि गैरसोयींचा सामना भाविकांना करावा लागला.
मंगळवारी दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील जसवंतीबेन (५६) आणि उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील संगीता गुप्ता (४८) या दोन महिला गर्दीत चेंगरल्याने बेशुद्ध पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली होती.
या घटनेच्या केवळ दुसऱ्याच दिवशी, बुधवारी आणखी दोन भाविकांनी प्राण गमावले. गुजरातमधील पाचवल येथील चतुर सिंह (५०) एका हॉटेलसमोर उभे असताना अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील ईश्वर सिंह (६५) हे कुबेरेश्वर धामाच्या आवारातच अचानक चक्कर येऊन पडले आणि त्यांचीही प्राणज्योत मालवली. दोघांचे मृतदेह सध्या सीहोर जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उद्ध्वस्त
या दोन दिवसांत चार भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या भक्तांच्या व्यवस्थेसाठी प्रशासन आणि आयोजक पुरेसे सज्ज नसल्याचेही यातून दिसून येत आहे. उष्माघात, दमछाक, गर्दीत गुदमरून जाणे, अशा समस्यांमुळे ही स्थिती गंभीर बनली आहे. ही यात्रा श्रद्धेचा महापर्व आहे, पण नियोजन आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली नाही, तर भाविकांना आपला जीव गमवावा लागतो, हे वास्तव पुन्हा एकदा या घटनांनी स्पष्ट केलं आहे.