सौजन्य- iStock
एचआयव्ही: भारतातील एका राज्यातून एचआयव्हीसंदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. एचआयव्हीसंदर्भात अहवालानुसार, त्रिपुरामध्ये आतापर्यंत ८२८ विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर ४७ विद्यार्थ्यांचा या भयंकर आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “आतापर्यंत आम्हाला ८२८ विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी ४७ मुलांचा एचआयव्ही या प्राणघातक आजारामुळे जीव गेला आहे. एचआयव्ही संक्रमित अनेक विद्यार्थी देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी त्रिपुराच्या बाहेर गेले आहेत.”
त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीला २२० शाळा आणि २४ महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी आढळून आले जे इंजेक्शन औषधे, ड्रग्स वापरत आहेत. TSACS च्या सहसंचालकांनी ANI ला सांगितले की, आतापर्यंत २२० शाळा आणि २४ महाविद्यालये आणि विद्यापीठे तपासले गेली आहेत, जिथे विद्यार्थ्यांना इंट्राव्हेनसद्वारे इंजेक्शन देऊन ड्रग्सचे व्यसन आढळले आहे. आम्ही राज्यभरातील एकूण १६४ आरोग्य सुविधांमधून माहिती गोळा केली आहे. हे प्रेझेंटेशन करण्यापूर्वी जवळपास सर्व ब्लॉक आणि उपविभागातून अहवाल गोळा केला गेला.
सहसंचालक पुढे म्हणाले की, बहुतांश घटनांमध्ये श्रीमंत कुटुंबातील ही मुले एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. अशीही कुटुंबे आहेत जिथे आई-वडील दोघेही सरकारी सेवेत आहेत आणि मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यात त्यांना कसलीही हयगय नाही. त्यांची मुले ड्रग्जच्या आहारी गेल्याचे त्यांना कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
संसर्गाचे मुख्य कारण: ड्रग्ससाठी सुया शेअर करणे
एचआयव्ही/एड्स ही एक महत्त्वाची जागतिक आरोग्य समस्या आहे, जी थेट इंट्राव्हेनस ड्रग्सच्या गैरवापराशी संबंधित आहे. औषध वापरकर्त्यांमध्ये सुया शेअर करणे ही एचआयव्ही प्रसाराचे मुख्य कारण ठरले आहे, ज्यामुळे विषाणू रक्त-ते-रक्त या थेट सुईच्या संपर्काद्वारे पसरू शकतो. बऱ्याच क्षेत्रांमध्ये, अशा वर्तनामुळे नवीन एचआयव्ही संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. . सुया, सिरिंज किंवा इतर इंजेक्शन उपकरणे शेअर केल्याने एचआयव्ही संक्रमणाची शक्यता अत्यंत वाढते.
ड्रग्समुळे तरुणाच्या जीवाचा खेळ होत आहे. ड्रग्सच्या सेवनाने त्यांचे आरोग्य बिघडत आहे आणि अनेक आजार होत आहेत. त्यासोबत आता एचआयव्हीसारख्या धोकादायक रोगाचे संक्रमणही ड्रग्ससेवन आणि त्यासंबंधी वर्तणूकीमुळे होत आहे. त्यामुळे यासंबंधी वेळीच जगजागृती आणि समुपदेशन होणे गरजेचे आहे. अन्यथा हे प्रमाण वाढू शकते.