बिहारने रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुपच्या जेतेपदावर कोरले नाव(फोटो-सोशल मीडिया)
Ranji Trophy Plate Group Final 2025-26: बिहारने बीसीसीआय-आयोजित रणजी ट्रॉफीचे प्लेट ग्रुपच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. बिहारने मणिपूरला ५६८ धावांनी धूळ चारून एलिट ग्रुपमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. पुढील हंगामापासून, बिहार रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये एलिट ग्रुपमध्ये खेळताना दिसणार आहे. या हंगामामध्ये बिहारने तिन्ही फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी केली आहे.
पाटण्यातील मोईनुल हक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुपच्या अंतिम सामन्यात, बिहारने मणिपूरला ५६८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून जेतेपद आपल्या खिशात टाकले आहे. २२ ते २६ जानेवारी दरम्यान खेळवण्यात आलेल्या या सामन्यात, बिहारने दोन्ही डावांमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा उभ्या केल्या, मात्र मणिपूर दोन्ही डावांमध्ये एकत्रितपणे ५०० धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
मणिपूरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु बिहारच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. कर्णधार साकिबुल गनीने पहिल्या डावात १०८ धावा केल्या, तर यष्टीरक्षक-फलंदाज विपिन सौरभने १४३ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. खालच्या क्रमावर फलंदाजी करताना सूरज कश्यपने ८३ धावा केल्या आणि संघाला ५२२ धावांचा टप्पा गाठला. प्रत्युत्तरादाखल, मणिपूरचा पहिला डाव २६४ धावांवरच गडगडला आणि पहिल्या डावात २५८ धावांची मोठी आघाडी मिळाली.
बिहारच्या दुसऱ्या डावात देखील फलंदाजांनी वर्चस्व राखले. संघाने आपला डाव ६ बाद ५०५ धावांवर घोषित केला. सलामीवीर पियुष सिंगने ३२२ चेंडूत नाबाद २१६ धावांची संस्मरणीय खेळी साकारली. हे पियुषचे पहिले द्विशतक ठरले. तर खालिद आलमने ८१ धावा केल्या आणि रघुवेंद्र प्रताप सिंग ९० धावा केल्या.
हेही वाचा : IND vs NZ T-20 Series : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी! संघातील स्थान राहणार कायम; तिलक वर्मा T20I मालिकेबाहेर
पहिल्या डावातील आघाडी मजबूत राखत बिहारने मणिपूरला विजयासाठी ७६४ धावांचे मोठे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल, मणिपूरचा दुसरा डाव देखील १९५ धावांवर गारद झाला आणि परिणामी ५६८ धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या डावात बिहारच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी बजावली. सूरज कश्यप आणि हिमांशू सिंग यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर प्रशांत सिंग यांनी दोन बळी घेतले. रघुवेंद्र प्रताप सिंग आणि आकाश विभूती राज यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. बिहारचा कर्णधार साकिबुल गनी यांना त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला तर मणिपूरचा फिरोइजाम जोतीन सिंग यांना मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. फिरोइजामने स्पर्धेत ३३५ धावा केल्या आणि १५ बळी घेण्याची किमया साधली.






