गेल्या 17 दिवसापासून उत्तराखंडच्या सिल्कियारा बोगद्यात (Uttarakhand Tunnel Collapse Rescue: ) अडकेलेल्या 41 कामगारांनी मंगळवारी (28 नोव्हेंबर) हे जग पाहिलं. इतक्या दिवसाच्या या बचाव अभियानाला शेवटी यश मिळालं आणि हे सर्व कामगार सुरक्षितपणे 28 नोव्हेंबर रोजी बोगद्यातून बाहेर आले. त्यांचे कुटुंबीय गेल्या 17 दिवसांपासून त्यांची वाट पाहत होते. कामगार बाहेर येताच त्यांचा आंनद गगनात मावेनासा झाला. मात्र, यातील एक मजूर एवढा दुर्दैवी होता की, तो स्वत: सुखरूप बाहेर आला, मात्र तो बाहेर येताच त्याच्या वडिलांचं छत्र हरपल्याचं त्याला सांगण्यात आलं.
भक्तू मुर्मू असे या दुर्दैवी मजुराचे नाव असून तो झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील बंकशील पंचायतीमधील बहदा गावातील रहिवासी आहे. 28 नोव्हेंबरच्या रात्री भक्तूला सर्व मजुरांसह सुखरूप बाहेर काढण्यात आले. पण बाहेर आल्यावर त्याला एक दुर्दैवी बातमी मिळाली. काही काळापूर्वी त्यांचे वडील हे जग सोडून गेल्याचे भक्तूला सांगण्यात आले.
वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून भक्तू मुर्मू ढसाढसा रडू लागला. गेल्या 17 दिवसांपासून तो बाहेर पडताच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटेल या आशेने तो बोगद्याच्या आत जिवंत होता, पण नशिबाला काही वेगळच मान्या होतं. भक्तू व्यतिरिक्त, बोगद्यात पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील डुमरिया ब्लॉकमधील आणखी 6 मजूर होते.
रिपोर्ट्सनुसार, 29 वर्षीय भक्तूचे वडील 70 वर्षांचे होते. तो गावातच राहत होते. मंगळवारी सकाळी न्याहारी करून ते कॉटवर बसले असताना अचानक ते खाली पडले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या आठवणीने धक्का बसल्याने भक्तूच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी, बरसा मुर्मू यांच्या जावयाने सांगितले की, जेव्हापासून त्यांना त्यांचा मुलगा बोगद्यात अडकल्याची बातमी मिळाली तेव्हापासून ते खूप काळजीत होते. बरसा मुर्मूच्या मृत्यूने भक्तूच्या आईलाही मोठा धक्का बसला आहे.