अरविंद केजरीवाल यांचे 'यमुना' वादावर निवडणूक आयोगाला उत्तर (फोटो- ट्विटर)
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. त्यासाठी जोरदारपणे प्रचार सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी यमुना नदीतील पाण्याबाबत एक वक्तव्य केले होते. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यावर केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आयोगाने केजरीवाल यांना उत्तर देण्यास सांगितले होते. आज अरविंद केजरीवाल यांनी आपले उत्तर निवडणूक आयोगासमोर सादर केले आहे.
निवडणूक आयोगाकडे उत्तर देताना केजरीवाल म्हणाले, ” जर का आम आदमी पक्षाने विरोध केला नसतं तर, दिल्लीचे एक कोटी नागरिक पाण्यापासून वंचित राहिले असते.” त्यांनी निवडणूक आयोगावर पक्षपाती करण्याचा आरोप लावला. हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या विरुद्ध कारवाई करण्याऐवजी निवडणूक आयोग मला दोष देत आहे असा आरोप केजरीवाल यांनी केला.
केजरीवाल यांनी यमुना नदीसंदर्भात वक्तव्य केल्याने राजकारण तापले आहे. निवडणूक आयोगाला उत्तर देताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “जर का आम्ही विरोध केला नसतं तर, दिल्लीच्या एक कोटी जनतेला पाण्यापासून वंचित राहावे लागले असते. कारवाई का केली नाही असे मला आयोगाने विचारले आहे. मी दिल्लीला पाण्याच्या अडचणीपासून वाचवले आणि हे मलाच शिक्षा देत आहेत. निवडणूक असलेल्या राज्याशेजारील राज्य पाणी अडवून निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतात. निवडणूक आयोग आज भाजपविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीये.”
‘यमुने’वरून राजकारण तापलं; फडणवीसांची केजरीवालांवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यमुना नदी स्वच्छ करू असे वचन दिले होते. नदी साफ करून त्यात मंत्रीमंडळासह डुबकी मारतील असे त्यांनी सांगितले होते.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बलबीर मतदारसंघात प्रचारसभा घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी यमुना नदीच्या प्रदूषणावरून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांनी वचन दिले होते की, ते यमुना नदी स्वच्छ करतील. त्यानंतर ते आणि त्यांचे मंत्रिमंडळ यमुनेत स्नान करतील. मात्र आता तर यामुनेचे पाणी आधीपेक्षा जास्त प्रदूषित आहे. अरविंद केजरीवाल तुम्ही आताच तुमच्या मंत्रिमंडळासह यमुनेत डुबकी मारा आणि दिल्लीपासून दूर निघून जा. दिल्लीची जनता तुम्हाला हेच सांगत आहे.”
यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या
प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात सोनीपत कोर्टाने केजरीवाल यांना नोटिस धाडली आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की हरियाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे. तथापि, दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे.