नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हिंदू कुटुंबांना लक्ष्य (Jammu Kashmir Hindu Target Killing) करण्यात आले आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पुंछ जिल्ह्यातील काही घरांवर रविवारी रात्री दगडफेक ( Stone Pelting In Poonch ) करण्यात आली. तूर्त ही दगडफेक कुणी केली हे स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे नागरिकांत दहशत पसरली आहे. स्थानिकांनी या घटनेनंतर पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. गावात राजौरीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. मागील 9 दिवसांतील हा चौथा हल्ला आहे. यापूर्वी 1 जानेवारी रोजी सायंकाळी राजौरीच्या डोंगरी भागात गोळीबार झाला होता. त्यात 5 हिंदूंचा बळी गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आयईडी स्फोट झाला होता. त्यातही 2 मुलींचा बळी गेला होता. त्यानंतर निदर्शनांत झालेल्या हल्ल्यांत अनेकजण जखमी झाले होते.
आधार कार्ड पाहून अंदाधूंद गोळीबार
एका आठवड्याभरापूर्वी डोंगरीत हिंदूंच्या हत्येविरोधात निदर्शने केली होती. ही निदर्शने संपल्यानंतर काही वेळातच एका घरात स्फोट झाला. त्यानंतर मोठी अफरातफरी माजली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. स्थानिकांच्या माहितीनुसार, गत रविवारी सायंकाळी आलेल्या अतिरेक्यांनी ग्रामस्थांना घराबाहेर काढून रांगेत उभे केले. त्यानंतर सर्वांचे आधार कार्ड पाहून त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. या हल्ल्यात सतीश कुमरा, प्रतीम लाल, शिवपाल या 3 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य एका व्यक्तीचा बळी गेला. पण त्याचे नाव समजू शकले नाही.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी गोळीबार
नववर्षाच्या पहिल्या दिवशी जम्मू काश्मीरमध्ये 3 अतिरेकी घटना घडल्या. अतिरेक्यांनी राजौरी जिल्ह्यातील डोंगरी गावात 1 जानेवारी म्हणजे गत रविवारी सायंकाळी गोळीबार केला. त्यात 4 हिंदूंचा बळी गेला. तर 7 जण जखमी झाले. स्थानिकांच्या माहितीनुसार, अतिरेक्यांनी घरात जाऊन आधार कार्ड पाहून गोळीबार केला. त्यांच्या टार्गेटवर काश्मीरबाहेरील लोक होते.
गावात पुन्हा एकदा आयईडी स्फोट
या घटनेला 24 तास होत नाहीत तोच याच गावात पुन्हा एकदा आयईडी स्फोट झाला. त्यात 2 मुलींचा बळी गेला. या घटनेत 4 जणही जखमी झाले. हा स्फोट रविवारी सायंकाळी हल्ला झालेल्या 3 पैकी एका घरात झाला. घटनेनंतर राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत आणखी एक आयईडी आढळला. तो नंतर डिफ्युज करण्यात आला.