File Photo : India Bloc
लखनौ : महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या विधानसभा निवडणुकीसोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाने काही ठिकाणी पोटनिवडणुकीची घोषणाही केली आहे. त्यात समाजवादी पक्ष (SP) नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉक आगामी पोटनिवडणुकीत सर्व नऊ जागा सपाचे निवडणूक चिन्ह सायकल वापरून लढवणार आहे.
सायकल हे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. या निर्णयाची घोषणा करताना सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, ‘आघाडीची रणनीती जागावाटपाच्या गणनेपेक्षा विजयावर आधारित आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष महत्त्वपूर्ण विजय मिळविण्याच्या प्रयत्नात एकत्र आहेत. इंडिया ब्लॉक या पोटनिवडणुकीत विजयाचा नवा अध्याय लिहिणार आहे’, असे त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
आगामी निवडणुका देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक समाजाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी महत्त्वाच्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, उत्तर प्रदेशात 13 नोव्हेंबरला नऊ मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यानुसार, आता तयारी केली जात आहे.
‘या’ मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
या मतदारसंघांमध्ये कटहारी आंबेडकर नगर, करहल मैनपुरी, मीरपूर मुझफ्फरनगर, गाझियाबाद, माझवान मिर्झापूर, सिसामाऊ कानपूर सिटी, खैर अलीगढ, फुलपूर प्रयागराज आणि कुंडरकी मुरादाबाद यांचा समावेश आहे. लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे यापैकी आठ जागा रिक्त झाल्या आहेत. सपा आमदार इरफान सोलंकी यांना गुन्हेगारी शिक्षेनंतर अपात्र ठरवल्यामुळे सिसामाऊ जागेवर पोटनिवडणूक आवश्यक आहे.