पत्नीच्या नावावरील मालमत्तेवर कुटुंबाचाही हक्क, पण …; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

अलाहाबाद उच्च न्यायालयाने कौटुंबिक मालमत्तेच्या वादावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर कोणतीही मालमत्ता खरेदी केली असेल आणि ती नोंदणीकृत केली असेल तर तिच्या कुटुंबातील सदस्यांचाही त्यात हिस्सा असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

    अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाने कौटुंबिक मालमत्तेच्या वादावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर कोणतीही मालमत्ता खरेदी केली असेल आणि ती नोंदणीकृत केली असेल तर तिच्या कुटुंबातील सदस्यांचाही त्यात हिस्सा असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

    उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, महिलेने स्वतःच्या कमाईने ही मालमत्ता खरेदी केल्याचे सिद्ध झाल्यावरच कुटुंबातील सदस्यांचा मालमत्तेवर हक्क मानला जाणार नाही. परंतु ती महिला गृहिणी असल्यास आणि तिच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यात आली असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांचाही त्यावर हक्क असेल. मृत वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मागणाऱ्या मुलाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अरुण कुमार सिंग देशवाल म्हणाले, याचिकाकर्त्याच्या वडिलांनी खरेदी केलेली मालमत्ता ही कौटुंबिक संपत्ती मानली जाईल. कारण सामान्यतः हिंदू पती कुटुंबाच्या फायद्यासाठी पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतो.

    न्यायालयाने पुढे म्हटले की, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की, पत्नीने कमावलेल्या उत्पन्नातून ही मालमत्ता खरेदी केली आहे, तोपर्यंत ती पतीने स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली मालमत्ता मानली जाईल आणि कुटुंबाचाही त्यावर अधिकार असेल.

    मालमत्तेत एक चतुर्थांश हिस्सा मिळवण्यासाठी खटला

    याचिकाकर्ते सौरभ गुप्ता यांनी त्यांच्या वडिलांनी खरेदी केलेल्या मालमत्तेत एक चतुर्थांश हिस्सा मिळावा म्हणून दिवाणी खटला दाखल केला होता आणि त्यांना मालमत्तेत सह-भागीदार म्हणून घोषित करण्याची विनंती न्यायालयाला केली होती.