केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत गरजले (फोटो - ani)
नवी दिल्ली/Corruption BIll: सध्या राजधानी दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन विधेयके मांडली. दरम्यान आज अमित शाह यांनी भ्रष्टाचार संबंधित संविधान दुरुस्ती विधेयक सादर केले. यानंतर संसदेत एकच गदारोळ उडाला. दरम्यान अमित शाह व विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी हे विधेयक फाडून अमित शहांच्या बाजूला फेकले. संसदेत नेमके के घडले ते जाणून घेऊयात.
लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भ्रष्टाचार संबंधित संविधान दुरुस्ती विधेयक सादर केले. हे विधेयक सादर करताच विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सरकार संविधानाची छेडछाड करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. संविधानाची मोडतोड करू नये, अशा घोषणा लोकसभेत दिल्या जात होत्या.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर दिले. अमित शाह म्हणाले, “त्यांनी माझ्यावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यानंतर मी स्वतः राजीनामा दिला होता. जोवर कोर्टाने मला निर्दोष मुक्त केले नाही तर,मी कोणतेही पद स्वीकारले नव्हते.” दरम्यान याच वेळेस विरोधकांनी घोषणाबाजी करताना विधेयक फाडून अमित शहांच्या दिशेने फेकले.
“कायदा सर्वांसाठी समान आहे. हे विधेयक मंजूर झाले तर मंत्र्यांची जबाबदारी अधिक वाढेल. अमित शाह यांच्या या व्यक्तव्याने विरोधकांनी सभागृहात अधिकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेल्या या विधेयकाला ओवेसी व कॉँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी विरोध केला. विरोधी पक्षांनी तीनही विधेयकांचा विरोध केला.
विरोधकांचा संसदेत राडा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आज संसदेत १३० वे संविधान दुरुस्ती विधेयक २०२५ विधेयक सादर केले. या विधेयकांतर्गत जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांना गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाली आणि त्यांना ३० दिवसांची अटक झाली तर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. अमित शहा यांनी संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, २०२५, केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक, २०२५, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२५ सादर केले. पण या विधेयकांना सुरूवातीपासूनच विरोध होता. विधेयक सादर करत असताना सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.