अमित शहांची रेड्डींवर टीका (फोटो- ani)
देशामध्ये एकीकडे विरोधकांनी मतचोरीच्या आरोपांना रान पेटवले आहे. तर दुसरीकडे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. यानंतर एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर इंडिया आघाडीकडून देखील बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुदर्शन रेड्डी यांच्यावर टीका केली आहे.
अमित शहा यांनी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर टीका केली आहे. सुदर्शन रेड्डी यांनी नक्षलवादाला समर्थन केल्याचा आरोप अमित शहा यांनी केला आहे. अमित शहा केरळमधील एका कार्यक्रमात बोलत होते. सुप्रीम कोर्टात न्यायाधीश असताना त्यांनी सलवा जुडूम वर निर्णय दिला नसता, तर देशभरात 2020 च्या आधीच नक्षलवाद संपुष्टात आला असता.
सुदर्शन रेड्डी यांनी नक्षलवादाचे समर्थन केले- शाह
2011 मधील सलवा जुडूम प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर बोलताना अमित शाह म्हणाले, सुदर्शन रेड्डी हे असे व्यक्ती आहेत. ज्यांनी नक्षलवादाचे समर्थन केले. त्यांनी सलवा जुडूम वर निर्णय दिला. यावर निर्णय दिला गेला नसता तर, 2020 च्या आधीच नक्षलवाद संपला असता.
न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी कोण आहेत?
न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. १९७१ मध्ये त्यांनी आंध्र प्रदेश बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट आणि दिवाणी खटल्यांमध्ये वकिली केली. १९८८-९० दरम्यान त्यांनी उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणूनही काम केले आहे.
न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी १९९० दरम्यान सहा महिने केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणूनही काम केले. २ मे १९९५ रोजी रेड्डी यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि २००५ मध्ये त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २००७ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि २०११ मध्ये ते निवृत्त झाले. आता त्यांना उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीने उमेदवारी दिली आहे. देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.