अहमदाबाद : ज्या बापूला एक नव्हे तर दोन बलात्कारांच्या प्रकरणात (Rape Case) जन्मठेप सुनावण्यात आली, त्या आसाराम बापूची (Asaram Bapu) आरती चक्क एका शाळेत करण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेतला. ही आरती या पाचही शिक्षकांच्या चांगलीच अंगाशी आलेली आहे. या प्रकरणी गुजरात सरकारनं (Gujrat Government) आता कठोर कारवाई केलीये. या पाचही शिक्षकांना दोषी धरुन या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या पाचही शिक्षकांना कच्छ्च्या वाळवंटात नोकरीसाठी पाठवण्यात आलंय. या शिक्षकांनी महिसागर जिल्ह्यात जामपगी प्राथमिक शाळेत हा प्रकार केला होता.
नेमकं कसा घडला प्रकार
या शिक्षकांनी प्राथमिक शाळेत व्हॅलेंटाईनच्या दिवशी मातृ-पितृ पूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी शाळेत आसाराम बापूचं पोस्टर लावण्यात आलं, इतकंच नाही तर त्याच्या फोटोची आरतीही करण्यात आली. या कार्यक्रमाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर हा सगळा प्रकार शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचच्या लक्षात आला, त्यांच्यावर कारवाईसाठी दबावही वाढला. गुजरात सरकारनंच व्हॅलेंटाईनच्या दिवशी मातृ-पितृ पूजनाचे कार्यक्रम शाळेत करण्याचे आदेश काढले होते.
दोन महिला शिक्षकांवरही कारवाई
या आरती प्रकरणावरुन टीका सुरु झाल्यानंतर, शिक्षण विभागानं तातडीनी कारवाई केली. या पाच शिक्षकांत तीन पुरुष तर दोन महिला शिक्षिका आहेत. वाईट कृत्य केलेल्या व्यक्तीच्या फोटोची आरती केली यासाठी बदलीची कारवाई करण्यात येत असल्यांचं त्यांच्या बदलीच्या आदेशात लिहिलेलं आहे. तसचं या प्रकरणात या पाचही जणांच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. असे शिक्षक असतील तर विद्यार्थ्यांच्या मानवर काय संस्कार बिंबवले जात आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.