गुवाहाटी : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू झाली आहे. सध्या यात्रा ईशान्य भारतात आहे. न्याय यात्रेबाबत काँग्रेस असा दावा करत आहे की, आसाम सरकार यात्रेला परवानगी देत नाही आणि यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांना त्रास दिला जात आहे.
आता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आसाममध्ये भाजपच्या लोकांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
हल्लेखोरांनी स्टिकरवर पाणी फेकले आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या. पण आम्ही संयम राखला, गुंडांना माफ केले आणि तेथून तत्काळ पुढे निघालो. निःसंशयपणे, हे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा करत आहेत. पण आम्ही घाबरलो नाही आणि लढत राहू असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.