ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश पचौरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी अनेक मंत्रालयांच्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. ते सलग चार वेळा राज्यसभेचे खासदार होते. भोपाळ येथील भाजप कार्यालयात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरेश पचौरी यांचे स्वागत केले.
सुरेश पचौरी यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सुरेश पचौरी यांनी भोजपूरमधून दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. ते दोन्ही वेळा भाजपच्या सुरेंद्र पटवा यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाले होते.
पचौरी यांच्यापाठोपाठ शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी काँग्रेसला राम राम ठोकण्याची शक्यता आहे. मंडीदीप, औबेदुल्लागंज, सुलतानपूर, बारीसह जिल्ह्यातील अनेक नेते पचौरी समर्थक आहेत. दुसरीकडे गजेंद्र सिंह राजुखेडी यांनी देखील काँग्रेसचा हाथ सोडला आहे. राजुखेडी हे 1998 ते 2004 पर्यंत खासदार होते.
त्यानंतर 2009 ते 2014 पर्यंत ते खासदार होते. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने ते पक्षावर नाराज होते. एवढेच नाही तर राहुल गांधींच्या न्याय यात्रेतही ते सहभागी झाले नाहीत. दरम्यान, सुरेश पचौरी आणि गजेंद्र राजुखेडी यांच्यापाठोपाठ इंदूर-१ चे माजी आमदार संजय शुक्ला यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.






