मुंबई : वर्ष संपता संपता देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनीला मोठा धक्का बसला आहे. सप्टेंबरमध्ये इन्फोसिसनं एका जागतिक स्तरावरील कंपनीसोबत केलेला मोठा करार मोडला आहे. हा करार 1.5 अब्ज डॉलर म्हणजेच 12500 कोटी रुपयांचा होता. याबद्दलची माहिती इन्फोसिसकडून देण्यात आलेली आहे. इन्फोसिसने 23 डिसेंबरला जागतिक कंपनीसोबतचा करार संपुष्टात आल्याची माहिती दिली.
कृत्रिमबुद्धिमत्तेशी (एआय) संबंधित असलेला करार मोडण्यात आल्याचा फटका इन्फोसिसला बसू शकतो. कंपनीनं इन्फोसिससोबतचा सामंजस्य करार संपुष्टात आणला आहे. हा करार 15 वर्षांचा होता. सप्टेंबर 2023 मध्ये करार करण्यात आला होता. इन्फोसिस आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जागतिक कंपनीला डिजिटल एक्सपीरियन्स आणि एआय सोल्युशन्स पुरवणार होती. या करारामुळे इन्फोसिससाठी गेला सप्टेंबर महिना कॉन्ट्रक्ट व्हॅल्यूच्या दृष्टीनं उत्तम गेला. पण अवघ्या तीन महिन्यांतच या कराराला ब्रेक लागला आहे. इन्फोसिसने याबद्दलची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली आहे.
जागतिक कंपनीनं आमच्यासोबतचा सामंजस्य करार संपुष्टात आणला आहे, असे इन्फोसिसकडून सांगण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांतला हा कंपनीसाठीचा दुसरा झटका आहे. कंपनीचे माजी सीएफओ नीलांजन रॉय यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे कंपनीला मोठा धक्का बसला. आता 12500 कोटींचा करार रद्द झाला आहे.
नारायण मूर्ती सहसंस्थापक असलेल्या इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 6,212 कोटींची कमाई केली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीची तुलना करता नफ्यात 3 टक्क्यांची वाढ झाली.