उत्तर प्रदेशात आयकर विभागाचा मोठा छापा; तब्बल 70 वाहनांमधून पथक घटनास्थळी
लखनौ : उत्तर प्रदेशात आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने संभल जिल्ह्यात मांस व्यापाऱ्यांच्या विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारीची कारवाई केली. आयकर विभागाची चार पथके या कारवाईत सहभागी झाली होती. छापे टाकण्यासाठी 100 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी 70 हून अधिक गाड्यांमध्ये आले.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोमवारी सकाळी ही कारवाई केली गेली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पथके आत कागदपत्रांची तपासणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा मानला जातो. सोमवारी सकाळी आयकर विभागाचे चार पथके मांस व्यापाऱ्यांच्या घरांवर, कारखाने आणि इतर आस्थापनांवर छापे टाकण्यासाठी आले. या छाप्यात 100 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.
हेदेखील वाचा : WHO On Cough Syrups : ‘विषारी’ कफ सिरपबाबत WHO चा इशारा, ‘या’ औषधांमुळे गंभीर आजाराचा धोका निर्माण
दरम्यान, घरांचे आणि इतर आस्थापनांचे दरवाजे आतून बंद होते आणि रात्री उशिरापर्यंत पथके आत कागदपत्रांची तपासणी करण्यात व्यस्त होती. आत असलेल्या लोकांना बाहेर पडू दिले जात नव्हते आणि बाहेरील लोकांना आत घेतले जात नव्हते. हा जिल्ह्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा मानला जात आहे.
मांस कारखाना केला सुरु
उत्तर प्रदेशातील इम्रान आणि इरफान यांनी 20 वर्षांपूर्वी मांस कारखाना सुरू केला होता. या कारखान्यापूर्वी ते दुसरा व्यवसाय करत होते. सध्या, संभल येथील कारखान्याव्यतिरिक्त, हे दोन्ही भाऊ हापूर, बरेली आणि कैराना येथे मांस कारखाने चालवतात. या मांस व्यापाऱ्यांची सध्या अनेक कोटी रुपयांची उलाढाल आहे. आयकर पथकाने पहाटे चार वाजता कारवाई सुरू केली आणि रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू ठेवल्याचे समोर आले.
सोशल मीडियावर एका डायरीची चर्चा सुरूच
मांस व्यापाऱ्यांच्या परिसरात कारवाई सुरू झाल्यानंतर, सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. आयकर पथकासह इतर एजन्सींच्या उपस्थितीचीही चर्चा झाली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या डायरीची चर्चा, विविध प्रतिक्रिया उमटल्या. ही डायरी चर्चेचा विषय राहिली आहे.