काँग्रेसला मोठा दिलासा; जुलैपर्यंत कारवाई नाही, आता याप्रकरणाची पुढील सुनावणी…

लोकसभा निवडणुकाजवळ आल्यावर आयकर विभागाने काँग्रेसला दोन नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागाकडून तब्बल 3,567 कोटींची कर थकबाकी भरण्यासाठी नोटीस आल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकाजवळ आल्यावर आयकर विभागाने काँग्रेसला दोन नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागाकडून तब्बल 3,567 कोटींची कर थकबाकी भरण्यासाठी नोटीस आल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी निवडणुका संपेपर्यंत करासाठी काँग्रेसवर कोणतीही जबरदस्ती करण्यात येणार नाही, असे आयकर विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे.

    न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर लोकसभा निवडणुका संपेपर्यंत विरोधी पक्षाच्या विरोधात कोणतीही जबरदस्ती कारवाई करणार नाही, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. निवडणुका सुरू असल्याने कोणत्याही पक्षाला कोणतीही अडचण येऊ नये, अशी विभागाची इच्छा असल्याचेदेखील ते म्हणाले.

    थकबाकीसाठी नोटिसा

    2014-15 साठी 663 कोटी, 2015- 16 साठी 664 कोटी आणि 2016- 17 साठी 417 कोटी रुपयांच्या कर नोटिसा काँग्रेसला बजावण्यात आल्या आहेत. प्राप्तिकर विभागाने एका छाप्यादरम्यान काँग्रेस नेत्याकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीमधील थर्ड पार्टीने केलेल्या नोंदींवरही कर आकारणी केली आहे.