महिलांबाबत केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून नितीश कुमार यांनी मागितली माफी; सभागृहात म्हटलं…

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून जोरदार टीका केली जात होती. अखेर त्यांनी बिहारच्या विधानसभा सभागृहात माफी मागितली.

    पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून जोरदार टीका केली जात होती. अखेर त्यांनी बिहारच्या विधानसभा सभागृहात माफी मागितली. ‘माझ्या विधानावरून जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी माझं विधान मागे घेतो. माझ्या विधानावरून दिलगिरी व्यक्त करतो’, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.

    बिहार विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली असल्याचे सांगितले. नेमकं याचदरम्यान त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावरून बिहारमध्ये राजकारण चांगलंच तापलंय. असे असताना नितीश कुमार यांनी भर विधानसभेत आपल्या विधानावरून माफीनामा जाहीर केला. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मी महिलांच्या शिक्षणावर बोललो होतो. आम्ही महिला शिक्षणावर भर देत आहोत. पण माझ्या विधानावरून जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी माझं विधान मागे घेतो. माझ्या विधानावरून दिलगिरी व्यक्त करतो’.

    दरम्यान, नितीश कुमार यांनी विधान केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात होती. मात्र, आता त्यांनी स्वत: त्यांच्या विधानावरून माफी मागितल्याने आता या वादावर पडदा पडणार असल्याची शक्यता आहे.

    काय म्हणाले होते नितीश कुमार?

    जर मुलगी शिकलेली असेल तर लोकसंख्या नियंत्रणात राहील. ‘जेव्हा लग्नानंतर रोज रात्री पुरुष करतात ना, त्यातूनच अजून मुलं जन्माला येतात. जर मुलगी शिकली असेल तर ते आत नका ***, त्याला *** ठेवा असं सांगेल. यातून संख्या कमी होत आहे’, असे म्हटले होते.