धक्कादायक! बेंगळुरूमधील 15 शाळांना उडवून देण्याची बॉम्बची धमकी

एकाच वेळी अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने बेंगळुरूमधील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. यापैकी एक शाळा डीके शिवकुमार यांच्या घरासमोर आहे.

    कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापैकी एक शाळा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोर आहे. डीके शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी टीव्ही पाहत होतो, माझ्या घरासमोरील शाळेलाही धमकीचा मेल आला होता. मी येथे चौकशी करण्यासाठी आलो आहे.” (Bomb threat to 15 schools in Bengaluru)
    यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळते की नाही याबाबत शाळांची झडती घेण्यास  सुरुवात केली आहे. तसेच ज्या शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या आल्या त्या सर्व शाळांमध्ये बॉम्ब निकामी पथके पाठवण्यात आली आहेत. ज्या शाळांना ही धमकी मिळाली आहे त्यात व्हाईटफिल्ड, कोरमंगला, बसवेशनगर, यालहंका आणि सदाशिवनगर येथील शाळांचा समावेश आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
    ‘घाबरण्याची गरज नाही’
    बेंगळुरूमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘पोलीस तपास करत आहेत आणि मी त्यांना निर्देश दिले आहेत. सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शाळांची तपासणी करून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत. पोलिस विभागाकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे.कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी सांगितले की, “आम्ही ईमेलचा स्रोत पडताळत आहोत. आम्ही ते गांभीर्याने घेत आहोत. प्राधान्याने तपास करण्यासाठी मी पोलिसांना कळवले आहे.”