आता याला काय म्हणावं? उद्घाटनापूर्वीच पुलाचा पिलरच कोसळला; पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह (संग्रहित फोटो)
गडचिरोली : कोरची तालुक्यातील नाडेकल-बेटकाठी-ढोलीगोटा मार्गावरील खोब्रागडी नदीवरील पुलाबाबत अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित बांधण्यात आलेला हा पूल वापरात येण्यापूर्वीच कोसळल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पुलाचे एक पिलर तसेच दोन स्लॅब हे एकदा नव्हे, तर तब्बल दोन वेळा कोसळले आहेत. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.
संबंधित कंत्राटदाराच्या कामावर बोट ठेवले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, पुलाचा तुटलेला भाग लपवण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे अवशेष रेतीखाली दाबण्यात आले. या प्रकारामुळे केवळ भ्रष्टाचाराचाच नव्हे, तर नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोपही होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. मात्र, चौकशी अहवालानंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी स्वतः पाहणी करत त्यांनीही नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ केला जात आहे. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदारांनी व्यक्त केली.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भोंगळ आणि निष्काळजी कारभारामुळे परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.






